Join us

मंत्रालयात तुमचं काम असेल तर आता पास चालणार नाही, अ‍ॅपवर मिळतो प्रवेश, कसं वापरावं अ‍ॅप?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 13:36 IST

क्यूआर कोड पाससाठी सर्वांना समान नियम, स्लॉट बुकिंग प्रक्रिया

मुंबई : मंत्रालयात प्रवेशासाठी राज्य सरकारने मोठा बदल केला असून, १५ ऑगस्टपासून प्रवेशासाठी केवळ ‘डीजी प्रवेश’ अ‍ॅपचा वापर करावा लागणार आहे. यामुळे गेटवर लागणाऱ्या रांगा ही संकल्पना मोडीत निघणार आहे. त्यामुळे नागरिकांना ठराविक वेळेत थेट संबंधित विभागात जाणे शक्य होणार आहे.

काय आहे ॲप?

नागरिकांना सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने मंत्रालयात प्रवेश देता यावा, यासाठी प्रवेश नियंत्रणात सुधारणा करून ही नवी डिजिटल प्रणाली लागू करण्यात आली आहे. ॲपवर नोंदणी करून संबंधित विभागाची भेटीची वेळ घेता येणार आहे. 

प्रवेशाचे कडक नियम

मंत्रालयात जाण्यासाठी आधार, पॅन, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही वैध ओळखपत्र आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतर ॲपवर क्यूआर कोड मिळतो. तो दाखवल्यानंतर सुरक्षा तपासणीत आरएफआयडी कार्ड दिले जाते. या कार्डाद्वारे व्यक्ती कोणत्या मजल्यावर व विभागात गेली, याची नोंद ठेवली जाईल. अनधिकृत हालचाली आढळल्यास कारवाई केली जाणार आहे.

स्लॉट बुकिंग प्रक्रिया

अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी गुगल पे स्टोअर आणि आयफोनसाठी ॲपल स्टोअरवर हे ॲप   आहे. तेथून हे ॲप डाऊनलोड करावे लागेल. ॲपमध्ये लॉगिन केल्यानंतर आधार क्रमांक व माहिती भरून ‘बुक स्लॉट’ पर्याय निवडावा. विभाग व अधिकारी ठरवून वेळ निवडल्यावर क्यूआर कोड तयार होतो. तो दाखवल्यावरच आरएफआयडी पास दिला जातो.

प्रवेशाच्या वेळा अधिकारी व कर्मचारी

  • सकाळी १०:०० नंतर - सामान्य नागरिक
  • दुपारी २:०० नंतर - वृद्ध व दिव्यांग
  • दुपारी १२:०० पासून - विशेष प्रवेश

क्यूआर कोड पाससाठी सर्वांना समान नियम

फक्त नागरिक नव्हे, तर सरकारी अधिकारी, कंत्राटी कर्मचारी व इतरांनाही याच पद्धतीने पास घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. गेटवर हेल्प डेस्क ठेवण्यात आले आहेत. तेथे कर्मचारी नोंदणी करून एसएमएसद्वारे पुष्टीकरण देतील. त्याआधारे क्यूआर कोड पास घेऊन मंत्रालयात प्रवेश मिळेल.

टॅग्स :मंत्रालय