राजकीय इच्छाशक्ती असेल, तर उद्योग भरभराटीस येतील; ‘लोकमत एक्सलन्स  अवॉर्डस् २०२५’ सोहळ्यात उद्योजकांचा सूर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2025 11:23 IST2025-03-03T11:23:41+5:302025-03-03T11:23:41+5:30

उद्योगधंद्यांच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारने उद्योगपूरक धोरणांची अंमलबजावणी करतानाच उद्योगांसाठीच्या पायाभूत सेवा- सुविधा उभारल्या पाहिजे.

if there is political will then industries will flourish entrepreneurs at lokmat excellence awards 2025 ceremony | राजकीय इच्छाशक्ती असेल, तर उद्योग भरभराटीस येतील; ‘लोकमत एक्सलन्स  अवॉर्डस् २०२५’ सोहळ्यात उद्योजकांचा सूर 

राजकीय इच्छाशक्ती असेल, तर उद्योग भरभराटीस येतील; ‘लोकमत एक्सलन्स  अवॉर्डस् २०२५’ सोहळ्यात उद्योजकांचा सूर 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: उद्योगधंद्यांच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारने उद्योगपूरक धोरणांची अंमलबजावणी करतानाच उद्योगांसाठीच्या पायाभूत सेवा- सुविधा उभारल्या पाहिजे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे राज्यातील विजेचे दर कमी केले पाहिजेत. या सगळ्यासाठी राजकीय इच्छाशक्ती असली पाहिजे, असा सूर उद्योजकांनी कफ परेडमधील हॉटेल प्रेसिडेंटमध्ये शुक्रवारी आयोजित  ‘लोकमत एक्सलन्स अवॉर्ड्स २०२५’ या पुरस्कार सोहळ्यादरम्यानच्या चर्चासत्रात व्यक्त केला.

क्रेडाई एमसीएचआय ठाणे अध्यक्ष जितेंद्र मेहता, एसएमई चेंबर ऑफ इंडिया, सीएमडी - मॅक्रो ऑफ कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे, पद्मावती पल्प अँड पेपर मिल्सचे व्यवस्थापकीय संचालक परेश शाह, राजा राणी ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष अभिजीत पाटील, लागू बंधूचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप लागू, पिल्लई संस्थांच्या समूहाच्या संचालक आणि हार्टफुलनेस ध्यान प्रशिक्षक डॉ. निवेदिता श्रेयांस, जेव्हीएम स्पेसचे संचालक मंथन मेहता, अल्फा कार्बनलेस पेपर मॅन्युफॅक्चरिंग कं. प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मण व्ही. कदम आदी मान्यवर चर्चासत्रात सहभागी झाले होते, तर मंथन मेहता यांनी चर्चासत्राचे सूत्रसंचालन केले.

गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्र इतर राज्याच्या तुलनेत पुढे आहे. पंतप्रधानांनी प्रत्येक राज्याला कामाचे टार्गेट दिले आहे. त्या दिशेने काम सुरू आहे. विजेचे दर कमी झाले पाहिजेत. पायाभूत सुविधा वाढविल्या पाहिजेत. विदेशी गुंतवणूक महत्त्वाची आहे. मात्र, स्थानिक उद्योजकांना प्राधान्य दिले पाहिजे. गुणवत्ता वाढविण्यासाठी जाचक कर काढले पाहिजेत, तर आपले उद्योगधंदे इतरांशी स्पर्धा करू शकतील. मात्र, यासाठी तशी राजकीय इच्छाशक्ती आणि धोरण हवे. - चंद्रकांत साळुंखे

जगभरात पर्यटन उद्योग भरभराटीस येत आहे. जगभरात फिल्म टूरिझम प्रथम क्रमांकावर आहे. यादृष्टीने आपणही पावले उचलली पाहिजेत. पर्यटन उद्योगावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. मुंबईत बॉलिवूड आहे. राज्यासह देशात पाहण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. त्यातून पर्यटन वाढविण्यावर भर दिला पाहिजे. मात्र, यासाठी इतर अनेक गोष्टींसोबत राजकीय इच्छाशक्तीही हवी. कोणत्याच कामात खोडा घालता कामा नये. - अभिजीत पाटील 

बांधकाम क्षेत्राला केंद्राकडून पर्यावरणीय मंजुऱ्या मिळविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याचा मोठा फटका बांधकाम क्षेत्राला बसतो. बांधकाम क्षेत्राशी विविध प्रकाराच्या २५० इंडस्ट्री जोडल्या गेल्या आहेत. बांधकाम क्षेत्राची प्रगती झाली तर या इंडस्ट्रीची प्रगती होईल. त्यातून रोजगार निर्मिती होईल. आता मुंबई महानगर प्रदेशासह महाराष्ट्र गेम चेंजर ठरणार आहे. कारण राज्यात बंदरांचे काम सुरू आहे. मेट्रो धावू लागल्या आहेत. समृद्धीसारखा महामार्ग आहे. - जितेंद्र मेहता

सोन्याला कायमच मागणी असते. कारण सोने आपण वापरत होतो, वापरत आहोत आणि वापरणार आहोत. सोन्याची मागणी वाढली म्हणून सोन्याचे दर वाढले, असे नसते. सोन्याचे दर जगभरातील घटनांवर अवलंबून असतात. डॉलरच्या किमतीवर दर कमी-जास्त होत असतात. या सगळ्या गोष्टी असतानाच आपल्याकडे कौशल्य असणाऱ्या कामगारांची मोठी गरज आहे, तसेच हिऱ्यांना मोठी मागणी असून, तसा पुरवठा करण्यासाठी किंवा निर्यातीवर भर देण्याकरिता दर्जेदार निर्मितीवर भर द्यावा. - दिलीप लागू

आपल्याकडे कौशल्य असणारे कामगार मिळत नाहीत, ही खंत आहे. यासाठी तरुणांनी नवीन तंत्रज्ञान शिकले पाहिजे. आत्मसात केले पाहिजे. आपण तंत्रज्ञानाची भीती बाळगता कामा नये. कारण तंत्रज्ञान हे एक ‘टूल’ आहे, माध्यम आहे. तंत्रज्ञान शिका, वापरा, त्यातून रोजगार मिळेल. आजघडीला तरुण स्वत:ला असुरक्षित समजत आहेत. तरुण सोशल मीडियाकडे वळत आहे. सोशल मीडियावरील चुकीचे आदर्श किंवा तत्सम गोष्टींनी तरुणांचे मने विचलित होत आहेत. असे होता कामा नये. - डॉ. निवेदिता श्रेयांस

मी उद्योग क्षेत्रात चाळीस वर्षांपासून कार्यरत आहे. उद्योग क्षेत्रात काम करताना आपण पर्यावरणाचाही विचार केला पाहिजे. सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घालण्यासाठी आपणाला खूप काम करावे लागले. मात्र, या गोष्टी गरजेच्या आहेत. उद्योगधंद्यांसाठी आवश्यक धोरणे अमलात आणतानाच कौशल्य विकासावर भर द्यावा लागेल. नवे तंत्रज्ञान आत्मसात करावे लागेल. यातून उद्योगांचा विकास होईल. शिवाय रोजगार निर्मितीसह संपत्तीचेही निर्माण होईल. - लक्ष्मण व्ही. कदम

आपण अनेक गोष्टींचा पुनर्वापर म्हणजे रिसायकल करायला शिकले पाहिजे. जगभरात कागदाला मोठी मागणी आहे. यामुळे या क्षेत्रातील निर्यातदारांना मोठी संधी आहे. मात्र, यासाठी सरकारनेही थोडे पाठबळ दिले पाहिजे. काही कर कमी करण्याची गरज आहे. आपल्याला मोठ्या प्रमाणावर वीज लागते. मात्र, आपल्याकडे विजेचे दर अधिक आहेत. इतर राज्याप्रमाणे विजेचे दर कमी केले पाहिजेत. - परेश शाह

कोणत्याही उद्योग क्षेत्राची भरभराट करण्यासाठी पुरेशा पायाभूत सेवा सुविधा असणे गरजेचे आहे. तसेच आजघडीला उद्योगांसमोर ज्या अडचणी आहेत, त्या सोडविण्यासाठी सरकारने धोरणात काही बदल केले पाहिजेत किंवा उद्योजकांशी संवाद साधला पाहिजे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि उद्योजक यांनी एकत्र येत, मोट बांधली, तर निश्चितच आपण विकासाच्या वाटेवर असू. - मंथन मेहता
 

Web Title: if there is political will then industries will flourish entrepreneurs at lokmat excellence awards 2025 ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.