मुंबई : विधानसभेला विरोधी पक्षनेते पद द्या, नाही तर उपमुख्यमंत्रिपद रद्द करा, अशी मागणी उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शिंदेसेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ॲनाकोंडा गिळंकृत करून त्यांचे अस्तित्व संपवणार, असा सूचक इशाराही मातोश्री येथे पत्रपरिषदेत शनिवारी त्यांनी दिला.
विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीकडून उद्धवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचे नाव देण्यात आले आहे. मात्र, त्यावर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेतलेला नाही. तर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या सदस्यत्वाची मुदत संपल्याने तेही पद रिक्त झाले आहे. त्यामुळे दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेत्यांअभावी नागपूरचे अधिवेशन होत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी दिल्लीचा पाठिंबा असूनही सरकार विरोधी पक्षनेते पदाला का घाबरत आहे, असा सवाल केला.
मतदारयादीबाबत सर्वोच्च न्यायालयाने लक्ष द्यावे
मतदारयादीतील घोळ मिटेपर्यंत निवडणुका घेऊ नये अशी सर्वोच्च न्यायालयाला विनंती आहे. लोकशाहीच्या या विषयाबाबत न्यायालयाने स्वतः लक्ष द्यायला हवे.
निवडणुकीमध्ये जे अनुभवले ते वाईट आहे. बूथ कॅप्चरिंग ऐवजी संपूर्ण निवडणूकच कॅप्चर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सत्ताधाऱ्यांकडून स्वत:ची घरे भरण्याचे काम सुरू असल्याची टीकाही ठाकरे यांनी केली.
उपमुख्यमंत्रिपद हे तरी कोणत्या कायद्यात आहे?
आम्हाला कायदे दाखवत असाल तर संविधानात कुठेही तरतूद नसणारे उपमुख्यमंत्री हे पदही तत्काळ रद्द करा. त्यांच्याकडे जी काही खाती असतील त्या खात्याचे त्यांना मंत्री बनवा.
तिजोरीच्या की बाथरूमच्या कुठल्या चाव्या द्यायच्या असतील त्या द्या, पण उपमुख्यमंत्रिपदाचे बिरुद त्यांनी लावता कामा नये, असे ते म्हणाले.
महायुतीमधील तिन्ही पक्षांची नावे, निशाण्या वेगळ्या असल्या तरी इतर दोन पक्ष हे भाजपच्या बी टीम आहेत. त्यांचा एकसंघपणा ‘गरज सरो, वैद्य मरो’ असे असल्याचा टोला त्यांनी लगावला.