पोलिसांनी परवानगी नाकारली, तरी ‘धारावी बचाव’ मोर्चा निघणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 09:50 AM2023-12-16T09:50:18+5:302023-12-16T09:51:00+5:30

मोर्चा आम्ही काढणारच, असा स्पष्ट इशारा धारावी बचाव आंदोलनाने राज्य सरकारला दिला आहे.

if the police refuse permission, the 'Dharavi rescue' march will take place in mumbai | पोलिसांनी परवानगी नाकारली, तरी ‘धारावी बचाव’ मोर्चा निघणार!

पोलिसांनी परवानगी नाकारली, तरी ‘धारावी बचाव’ मोर्चा निघणार!

मुंबई : अदानीविरोधात धारावी बचाव आंदोलन काढत असलेल्या सर्वपक्षीय मोर्चाची सरकारने धास्ती घेतली आहे. त्यामुळेच धारावीत लावलेले मोर्चाचे बॅनर्स मुद्दाम काढले जात आहेत. आमच्या सभांवर पाळत ठेवली जात आहे. पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतरही आम्हाला मुद्दाम मोर्चासाठी परवानगी दिली जात नाही. अशाप्रकारे कितीही अडथळे आणले, परवानगी दिली नाही. तरी अदानी विरोधातील मोर्चा आम्ही काढणारच, असा स्पष्ट इशारा धारावी बचाव आंदोलनाने राज्य सरकारला दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे.

आज धारावी ते अदानी कार्यालय, असा मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी ॲड. राजेंद्र कोरडे, माजी आमदार बाबुराव माने, विठ्ठल पवार, उल्लेश गजाकोश, संदीप कटके, श्यामलाल जयस्वार, संजय भालेराव, शैलेंद्र कांबळे, मिलिंद रानडे यांनी पत्रकार संघात माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी हा इशारा दिला.

प्रकल्पाच्या एकत्रित भूखंडावर सरसकट ४ चटई क्षेत्र निर्देशांक देणे, महाराष्ट्र नेचर पार्कची ४० एकर जागा पुनर्विकास प्रकल्पाचा हिस्सा बनवने, टीडीआर मुंबईत कोठेही वापरण्यास मंजुरी देणे, ८० टक्के अधिकार अदानीला देणे अशा अनेक शुल्कमाफीतून अदानी रिएल्टीवर शासनाने मुक्तहस्ते उधळण केली.  

जनतेच्या मनात भीती...

  अशा अदानी रिएल्टीचा बांधकाम क्षेत्रातील काहीही लौकिक नाही. भांडवली बाजारातील अदानीची पत ढासळली असून दिवाळखोरीच्या वाटेवर आहे. 
 अशा अदानीकडून धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे काम पूर्णत्वास जाईल, याची धारावीकरांना खात्री नाही. 
 अदानी पुनर्विकासाचे काम अर्धवट सोडून देईल, अशी भीती धारावी जनतेच्या मनात असल्यामुळे अदानी हटाव, धारावी बचाव अशी भूमिका आम्ही घेतली आहे, असे धारावी बचाव आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

म्हाडा माध्यमातून हा प्रकल्प राबवावा :

मॅच फिक्सिंग पध्दतीने टेंडर प्रक्रिया राबवून, अदानी रिएल्टीला मंजूर केलेली निविदा रद्द करावी, म्हाडाचे माध्यमातून शासनाने हा प्रकल्प राबवावा तसेच म्हाडाचे माध्यमातून धारावी पुनर्विकास प्रकल्प राबवितेसमयी स्थानिक जनतेच्या खालील न्याय्य मागण्यांचा समावेश करावा, अशा आमच्या प्रमुख मागण्या असल्याचे धारावी बचाव आंदोलनाचे समन्वयक ॲड. कोरडे यांनी सांगितले.

Web Title: if the police refuse permission, the 'Dharavi rescue' march will take place in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.