रस्त्यांची चाळण झाली तर पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई होणार, आयुक्तांचे स्पष्ट आदेश! अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 12:49 IST2025-06-11T12:46:35+5:302025-06-11T12:49:48+5:30

मुंबईत दरवर्षीप्रमाणे यंदाही रस्त्यांमध्ये जागोजागी खड्डे पडण्यास सुरुवात झाल्याने ते भरण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे.

if roads seen with potholes action will be taken against municipal officials clear orders from the Commissioner bhushan gagrani | रस्त्यांची चाळण झाली तर पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई होणार, आयुक्तांचे स्पष्ट आदेश! अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले

रस्त्यांची चाळण झाली तर पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई होणार, आयुक्तांचे स्पष्ट आदेश! अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले

मुंबई

मुंबईत दरवर्षीप्रमाणे यंदाही रस्त्यांमध्ये जागोजागी खड्डे पडण्यास सुरुवात झाल्याने ते भरण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. त्यासाठी मुंबईतील सर्व २२७ प्रभागांच्या दुय्यम अभियंत्यांनी दररोज आपापल्या कार्यक्षेत्रातील खड्डे शोधून ते लहान आकाराचे असतानाच भरावेत, अशा स्पष्ट सूचना आयुक्त भूषण गगराणी यांनी दिल्या आहेत. मुंबईकरांना रस्ते प्रवासात खड्ड्यांमुळे कोणत्याही गैरसोयींना सामोरे जावे लागू नये म्हणून खड्डेमुक्त रस्त्यांचे उद्दीष्ट ठेवून कार्यवाही करावी, असे त्यांनी म्हटलं. दरम्यान पावसाळ्यात खड्ड्यांमुळे मुंबईतील कोणत्याही रस्त्याची चाळण झाल्याचे दिसल्यास अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा सक्त इशारा गगराणी यांनी दिला आहे. 

पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी रस्ते व वाहतूक विभागाच्या अभियंत्यांची सोमवारी बैठक घेतली. काँक्रीट रस्त्यांमुळे खड्ड्यांची समस्या कमी होत असून भविष्यात ती आणखी कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

कार्यालयात बसून कामकाज नको
२२७ प्रभागांतील दुय्यम अभियंत्यांकडे प्रत्येकी १० ते १५ किलोमीटर रस्ते कार्यक्षेत्राची जबाबदारी आहे. त्यांनी कार्यालयात बसून कामाचा आढावा न घेता प्रत्यक्ष फिल्डवर जावे, तरच खड्ड्यांची स्थिती नियंत्रणात राहील, अशी सूचना अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली. शिवाय, गाड्यांमध्ये बसून नाही, तर दुचाकीवरुन रस्त्याचा दौरा केल्यास खड्ड्यांची परिस्थिती समजण्यास मदत होईल आणि ते वेळेत भरता येतील, असेही नमूद केले. 

खड्डा कसा भरावा?
खड्डा भरताना तो चौकोनी आकारात भरावा. त्याचा आकार ओबडधोबड नसावा. सहा मीटरपुढील रस्त्यांवर आढळणारे खड्डे बुजविण्यासाठी कोल्ड मिक्सचा वापर करू नये. 

केवळ मास्टिक अस्फाल्टद्वारे खड्डे बुजवावेत. याव्यतिरिक्त काही रस्त्यांवर जीओ पॉलिमर काँक्रीटचा वापर करावा, अशा सूचना बांगर यांनी अधिकाऱ्यांना केल्या. 

जीपीएस प्रणाली नसल्यास खर्च मिळणार नाही
१. रस्त्यावरील खड्डे मास्टिक यंत्रणेच्या वाहनाद्वारे भरले जाणार असल्याने विभागीय पातळीवर त्यांची उपलब्धता असावी. 
२. शिवाय, संबंधित कंत्राटदारांना सूचना देऊन मास्टिकचे उत्पादन आवश्यक तेव्हा व आवश्यक त्या प्रमाणात पुरवठा होईल, यासाठी विशेष लक्ष द्यावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. 
३. मास्टिक यंत्रणा वाहनांच्या कामकाजाचा व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टीमद्वारे मागोवा घेतला जाणार आहे. त्यामुळे वाहनाला जीपीएस प्रणाली नसेल तर कामाचा मोबदला देय राहणार नाही, असे बांगर यांनी स्पष्ट केले आहे. 

Web Title: if roads seen with potholes action will be taken against municipal officials clear orders from the Commissioner bhushan gagrani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.