Join us  

ठरलंय ते मान्य असेल तर फोन करा, उद्धव ठाकरेंचा एकच कॉल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2019 5:28 AM

उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावले

मुंबई : लोकसभा निवडणुकीपूर्वी युतीचा फॉर्म्युला ठरवताना जे-जे ठरलंय त्यानुसार करायचे असेल तर फोन करा, मी चर्चेला तयार आहे या शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला गुरुवारी सुनावले. शिवसेना आमदारांच्या बैठकीत भावनिक होऊन उद्धव म्हणाले की मी काय चुकलो ते सांगा. शिवसेना कधीही शब्द फिरवत नाही. ती आमची संस्कृती नाही पण मित्र शब्द फिरवणार असेल तर आम्ही ते का सहन करायचे? भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मला शब्द दिला होता. मुख्यमंत्री पदासह सर्व काही निम्मे निम्मे ठरलेले होते मग आता भाजप मागे का जात आहे, असा सवाल त्यांनी केला.

युती मला तोडायची नाही. जे ठरलंय तेवढंच मी मागतोय. त्यापेक्षा अधिक कणभरही मागत नाही मग शब्द फिरवून युती तोडायला कोण निघाले आहे, असा सवाल करून ते म्हणाले की शिवसेना एकसंध आहे, आम्ही आमची ताकद दाखवून देऊ.

शिवसेना आमदारांनी दिले उद्धव यांना सर्वाधिकारराज्यात सत्ता स्थापन करण्यासंदर्भात तुम्ही घ्याल तो निर्णय आमच्यासाठी शिरसावंद्य असेल, शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा अशी आमची भावना असून त्यासाठी आमच्या संपूर्ण शुभेच्छा आपल्या पाठीशी आहेत, अशी ग्वाही पक्षाच्या आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना गुरुवारी दिली.शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार आणि पक्षाला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांची बैठक मातोश्रीवर झाली. त्यावेळी आमदारांनी उद्धव यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद हे शिवसेनेला देणार असतील तरच युती करा. या बाबत आम्ही आपल्या भूमिकेसोबत आहोत, असे यावेळी आमदारांनी उद्धव यांना सांगितले.मुख्यमंत्री पदाबाबत ठाकरे आणि खा.संजय राऊत यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल काही आमदारांमध्ये नाराजी असून ते कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत सरकार स्थापन करण्याच्या मूडमध्ये आहेत, अशी काही माध्यमांमधून चर्चा असताना आजच्या बैठकीत मात्र शिवसेनेचे सर्व आमदार उद्धव यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे चित्र दिसले.

सत्तास्थापनेच्या विलंबास भाजप जबाबदार - राऊत यांचा आरोप

मुंबई : सर्वाधिक आमदार असलेला भाजप वेळकाढूपणा करीत असून सत्ता स्थापनेसाठीच्या विलंबास हाच पक्ष जबाबदार आहे असा आरोप शिवसेनेचे प्रवक्ते खा.संजय राऊत यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत केला. स्वत:ही सरकार स्थापन करायचे नाही आणि घटनात्मक पेच निर्माण करायचे हे आता चालणार नाही, असा इशारा त्यांनी भाजपला दिला.

ते म्हणाले की, कायदे के दायरे मे रहकर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार आहे. राज्यघटना ही तुमची जहागीर नाही. सरकार बनविण्यास असमर्थ आहोत हे भाजपने आधी जाहीर करावे मग शिवसेना पाऊलं उचलेल. राज्याला लवकरच नवे सरकार देईल. आमच्याकडे बहुमताचा आकडा आहे. आमच्याकडे पर्याय आहे, त्या शिवाय आम्ही बोलत नाही. शिवसेना कधीही आशेवर जगत नाही. आत्मविश्वासावर जगते. आमच्या आमदारांच्या निष्ठा आणि लोकांच्या विश्वासावरच आम्ही पुढे जाऊ. मतदारांना शिवसेनेच्या पाठीत खंजीर खूपसणाºया लोकांना धडा शिकवायचा आहे, असे राऊत म्हणाले.

महायुतीला जो कौल मिळाला आहे तो सत्तावाटपाचा जो समसमान फॉर्म्युला ठरलेला होता त्यामुळेदेखील मिळालेला आहे. २०१४ आणि २०१९ ची स्थिती वेगळी आहे. आता धमक्या, पोलीसी बळाचा वापर चालणार आहे. आम्ही संयमाचं राजकारण करतो. साम-दाम-दंड-भेद हे खुर्ची आहे तोवर चालतं. सत्तेचा माज उतरल्यानंतर ते चालत नाही. देवेंद्र फडणवीस हेही शिवसैनिकच आहेत असं भाजपचे नेते म्हणत असतील शब्द पाळण्याचा शिवसेनेचा संस्कारही त्यांनी घ्यायला हवा आणि अमित शहा, मोदींनी आमच्या पक्षात प्रवेश करावा, असा टोला राऊत यांनी हाणला.

टॅग्स :शिवसेनाउद्धव ठाकरेभाजपादेवेंद्र फडणवीस