एसटी चालविताना चालक मोबाइलवर बोलला तर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 03:11 IST2023-11-23T03:09:49+5:302023-11-23T03:11:01+5:30
कार्यवाही करण्याचे महामंडळाचे निर्देश

एसटी चालविताना चालक मोबाइलवर बोलला तर...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एसटी बस चालवत असताना मोबाइलवर बोलणे अथवा हेडफोन घालून गाणी, व्हिडीओ ऐकणे, बघणे आता चालकांना चांगलेच महागात पडणार आहे. राज्य परिवहन महामंडळाने थेट कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
मोबाइलमुळे एकाग्रता भंग करणारी कृत्ये चालकाकडून घडल्यास त्यांच्यावर प्रचलित नियमानुसार कडक कार्यवाही करण्याचे निर्देश एसटी प्रशासनाने दिले आहेत. एसटीचा प्रवास हा सुरक्षित प्रवास म्हणून ओळखला जातो. गेली ७५ वर्षे प्रवाशांची विश्वासार्हता जपण्यामध्ये एसटीच्या निर्व्यसनी व सुरक्षित वाहन चालवणाऱ्या चालकांचा खूप मोठा वाटा आहे. यापुढे अशा घटना निदर्शनास आल्यास संबंधित चालकावर निलंबनापर्यंतची प्रमादीय कार्यवाही करण्याचे निर्देश एसटी वरिष्ठ प्रशासनाने दिले आहेत.
प्रवाशांच्या मनात असुरक्षिततेची भावना
गेल्या काही दिवसांमध्ये एसटी बस चालवित असताना मोबाइलवर बोलणे, कानात हेडफोन घालून गाणी ऐकणे, मोबाइलवरील व्हिडीओ पाहणे अशा चालक व प्रवाशांच्यादृष्टीने अत्यंत धोकादायक असलेल्या कृत्यामुळे बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मनात असुरक्षिततेची भावना बळावते.
याबद्दल समाजमाध्यमातून, लोकप्रतिनिधींमार्फत अनेक तक्रारी एसटी महामंडळाकडे दाखल झाल्या आहेत.