Join us  

भाजपची सत्ता आल्यास 2019 ला मुख्यमंत्री व्हाल का? नाथाभाऊ म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 2:38 PM

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंनी मंत्रिमंडळ विस्तार, पुढील मुख्यमंत्री, 2019 विधानसभा निवडणुकांची तयारी यासंदर्भातील विविध प्रश्नांना उत्तरे दिली.

मुंबई - मला राजकीय षड्यंत्राचा बळी करण्यात आलं आहे, जनतेलाही हे माहित आहे. सरकारमधील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये अनेकांचे पुरावेही प्रथमदर्शनी हाती आले आहेत. मात्र, त्यांच्यावर कारवाई करण्याचं धाडस सरकार दाखवत नाही. पण, नाथाभाऊंवर केवळ आरोप होताच, राजीनामा मागण्याचं षड्यंत्र सुरू झालं. यावरुन, मला राजकीय षड्यंत्राचा बळी बनविल्याचं भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे. 

माजी मंत्री एकनाथ खडसेंनी मंत्रिमंडळ विस्तार, पुढील मुख्यमंत्री, 2019 च्या विधानसभा निवडणुकांची तयारी यासंदर्भातील विविध प्रश्नांना उत्तरे दिली. विधानसभेला राज्यात भाजप-सेना युतीचंच सरकार येईल. भाजपला देशभरात चांगलं वातावरण असून भाजपाचे सर्वाधिक आमदार निवडून यावेत, यासाठीच आम्ही प्रयत्नशील असल्याचे खडसे यांनी एका न्यूज पोर्टलशी बोलताना म्हटले. तसेच, 2019 ला राज्यात भाजपाची सत्ता आल्यास आपण मुख्यमंत्री होणार का? या प्रश्नावर खडसेंनी मी पक्षाचा कार्यकर्ता असून पक्ष जो आदेश देईल, तो मी पाळेन. पक्षाचा आदेश माझ्यासाठी अंतिम असेन. त्यामुळे पुढचा मुख्यमंत्री कोण हे ठरवण्याचं काम पक्षाचं असल्याच खडसेंनी म्हटलं आहे. तसेच, भाजपाचे जास्त आमदार आल्यास भाजपाचा मुख्यमंत्री होईल, आणि शिवसेनेचे जास्त आमदार आल्यास शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी हक्क सांगेन, असेही खडसेंनी यावेळी बोलताना सांगितले. 

दरम्यान, नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारातील मंत्रिपदासाठी मीच उत्सुक नव्हतो. केवळ तीन महिन्यांसाठी मंत्रीपद घेऊन काहीही उपयोग नसतो. कारण, तीन महिन्यात कुठलीही कामे तुम्हाला करता येत नाहीत. त्यामुळे आतासाठी मीच इच्छुक नसल्याचे खडसेंनी सांगितले.

टॅग्स :एकनाथ खडसेभाजपामुख्यमंत्री