Join us  

सोलापूरच्या रणजीतसिंह डिसले यांना तुकाराम मुढेंनीही ठोकला सलाम; म्हणाले...

By मुकेश चव्हाण | Published: December 04, 2020 2:59 PM

तुकाराम मुंढे यांनी रणजीतसिंह डिसले यांचं कौतुक केलं आहे.

मुंबई: सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजीतसिंह डिसले यांना जाहीर झालेल्या ग्लोबल टीचर पुरस्कारानंतर त्यांच्यावर महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनीही रणजीतसिंह डिसले यांच्या या यशानंतर त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत.

'Kudos to The Real Leadership in Education' म्हणजेच ''शिक्षण क्षेत्रातील खऱ्या नेतृत्त्वाला मानाचा मुजरा'' असं ट्विट करत तुकाराम मुंढे यांनी रणजीतसिंह डिसले यांचं कौतुक केलं आहे. ७ कोटीचा  ग्लोबल टीचर पुरस्कार ZP गुरुजी - रणजितसिंह डीसले यांना सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ७ कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर झाला आहे.हा पुरस्कार मिळवणारे ते जगातील सर्वोत्तम शिक्षक ठरले आहेत, असं तुकाराम मुंढे यांनी ट्विटरद्वारे सांगितले. 

तत्पूर्वी, युनेस्को व लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ग्लोबल टीचर पुरस्कर दिला जातो. या पुरस्काराची किंमत ७ कोटी रुपये इतकी आहे.  जगभरातील १४० देशांतील १२ हजारांपेक्षा अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून रणजीतसिंह डिसले यांची निवड झाली आहे. 'क्यूआर कोडेड' पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती रणजीतसिंह डिसले यांनी केली आहे. विशेष म्हणजे, पुरस्काराच्या एकूण रकमेपैकी ५० टक्के रक्कम डिसले यांनी अंतिम फेरीतील ९ शिक्षकांना देण्याचे जाहीर केले आहे. यामुळे ९ देशांमधील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल. डिसले यांना मिळालेली रक्कम ते टीचर इनोव्हेशन फंडाकरीता वापरणार आहेत.

दहा वर्षे विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कामाचे योग्यवेळी फळ मिळाले- रणजित डिसले

दहा वर्षे विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कामाचे योग्यवेळी फळ मिळाले. हा क्षण म्हणजे आयुष्यातील परमोच्च आनंदाचा क्षण आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने तसेच शिक्षण विभागाने मोलाचे सहकार्य केल्याची भावना ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजित डिसले यांनी व्यक्त 'लोकमत' शी बोलताना केली.

एकाच दिवशी दोन गुड न्युज...

रणजित डिसले यांचे वडील महादेव डिसले हे देखील सेवानिवृत्त जिल्हा परिषद शिक्षक आहेत. या पिता पुत्राने एकाच केंद्रात नोकरी केली आहे. महादेव डिसले यांना एक मुलगी आणि दोन मुले आहेत. मोठा मुलगा अमित हा इंजिनिअर असून तो महिंद्रा कंपनीत प्रोजेक्ट इंजिनिअर आहे. योगायोग म्हणजे आजच त्याचे ही प्रमोशन झाले आणि दुसऱ्या मुलाला जागतिक स्तरावरील पुरस्कार मिळाला हे अभिमानास्पद असल्याचे महादेव डिसले यांनी सांगितले.

टॅग्स :तुकाराम मुंढेसोलापूरमहाराष्ट्र