Join us

Sanjay Raut : सत्य धक्कादायक, इंटरव्हलनंतरचे कथानक मी सांगेन - संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 06:33 IST

Sanjay Raut : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात प्रभाकर साईल यांच्या व्हिडिओनंतर संजय राऊत यांनी एनसीबी कार्यालयातील व्हिडिओ ट्विट केला होता.

मुंबई : एनसीबीच्या कारवाईवरून रोज नवनवीन खुलासे समोर येत असून, राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. तर या प्रकरणात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आता मनी लाँड्रिंगची शक्यता वर्तविली आहे. मंत्री नवाब मलिक यांनी इंटरव्हलपर्यंतची गोष्ट सांगितली आहे, इंटरव्हलनंतरची कथा स्क्रीनप्ले मी तुम्हाला सांगेन. या प्रकरणातील तथ्य आणि सत्य धक्कादायक आहे. देशभक्तीचा मुखवटा पांघरून काय सुरू आहे याची चौकशी झाली पाहिजे, असे राऊत म्हणाले.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात प्रभाकर साईल यांच्या व्हिडिओनंतर संजय राऊत यांनी एनसीबी कार्यालयातील व्हिडिओ ट्विट केला होता. यासंदर्भात राऊत म्हणाले, या व्हिडिओतील एक व्यक्ती सॅम डिसोजा या नावाने ओळखली जाते. अनेक बडे नेते, वरिष्ठ अधिकारी अगदी एनसीबीचे अधिकारी यांच्या मनी लाँड्रिंगचे काम ही व्यक्ती करीत असल्याची माहिती आहे. याचे धागेदोरे थेट दिल्लीपर्यंत पोहोचले आहेत.

या व्हिडिओची सीबीआय चौकशीची मागणी भाजप नेत्यांनी केली होती. यावर राऊत म्हणाले की, सीबीआय चौकशी जरूर व्हावी. सीबीआय तुमच्याच खिशात आहे. तुम्हीही अनेक व्हिडिओ बाहेर आणले. पण, तुमच्या काळजाला वार झाला. अजून १० व्हिडिओ मी तुम्हाला देतो, करा चौकशी, असे आव्हानच राऊत यांनी दिले. प्रभाकर साईल या प्रकरणातील साक्षीदार आहे. त्याचा बालही बाका होणार नाही, याचा विश्वास मी तुम्हाला देतो. आम्ही त्याच्यापाठी आहोत, असे ते म्हणाले.

भानुशाली म्हणतो... माझ्याही जीवाला धोकाया प्रकरणातील आणखी एक पंच मनीष भानुशाली याने वृत्तवाहिनीवर येत, प्रभाकर साईल याने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्याही जिवाला धोका असून, पोलीस संरक्षण देण्याची मागणीही त्याने केली आहे.

टॅग्स :संजय राऊतआर्यन खानमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी