Join us  

मी कोरोनाची लस घेणार नाही; आमचा योगावतार जिंदाबाद आहे- बाबा रामदेव

By मुकेश चव्हाण | Published: January 04, 2021 12:13 PM

मला कोरोना देखील होणार नाही.

मुंबई: भारतासह संपूर्ण जगात कोरोनावरील लस तयार करण्यासाठी जोरात काम सुरू आहे. पुढच्या वर्षी म्हणजेच 2021 पर्यंत लोकांना कोरोनाची लस मिळेल, अशी सर्वांना आशा आहे. याचबरोबर, कोरोना लसीसंदर्भात केंद्र सरकारने सुद्धा आपली तयारी व नियोजन मजबूत केले आहे. मात्र मी कोरोनाची लस घेणार नाही. मला त्याची गरज नाही, असं योगगुरु बाबा रामदेव यांनी स्पष्ट केलं आहे. 

एका वृत्तवाहिनीवर बोलताना बाबा रामदेव म्हणाले की, "कोरोना प्रतिबंधक लसीमध्ये गायीची किंवा डुक्कराचीही चरबी नाही. हा हिंदू किंवा मुसलमानांचा विषय नाही. हा शुद्ध स्वरुपात वैज्ञानिक संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे याला कोणत्याही धर्माशी जोडता कामा नये, असं बाबा रामदेव यांनी सांगितले. 

मी वृत्तवाहिनीवर खुलेआम जाहीर करतो की, मी लसीचा वापर करणार नाही कारण मला याची गरज नाही. मला कोरोना देखील होणार नाही. मी अनेक लोकांना भेटतो आणि काही प्रमाणात खबरदारीही घेतो. कोरोनाचे किती अवतार येऊ देत मला काही होणार नाही. कारण आमचा योगावतार जिंदाबाद आहे, असं बाबा रामदेव यांनी सांगितले. तसेच कोरोनाशी घाबरुन राहण्याची गरज नाही. ज्यांना अनेक प्रकारचे आजार आहेत आणि ते योगही करतात. याशिवाय ज्यांना गरज आहे त्यांनी कोरोनाची लस जरुर घ्यावी. मी याच्या बाजूनेही नाही आणि विरोधातही नाही, असं बाबा रामदेव यांनी यावेळी सांगितले. 

आपल्या जीवनशैलीत योगाचा समावेश करण्याचा सल्लाही बाबा रामदेव यांनी लोकांना दिला आहे. बाबा रामदेव म्हणाले, "135 कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात 2021 मध्ये सामान्य लोकांना लस मिळेल याची शाश्वती नाही. अशा परिस्थितीत योग, आयुर्वेद आणि जीवनशैलीतील बदलांपासून लोकांचे प्राण वाचतील", असं बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज (4 जानेवारील) सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे. संसदेतील सर्व पक्षांच्या मुख्य नेत्यांना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे. देशात लॉकडाऊन झाल्यानंतर सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात सर्वपक्षीय बैठक झाली होती.

टॅग्स :रामदेव बाबाकोरोनाची लसकोरोना वायरस बातम्याभारतयोग