Join us

"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 08:54 IST

Raj Thackeray Hindi Language GR Maharashtra: महायुती सरकारने राज्यात पहिलीपासून त्रिभाषा सूत्र लागू केले होते. पण, संतप्त लाट उसळल्यानंतर सरकारने दोन्ही शासन निर्णय रद्द केले. 

Hindi Language GR Maharashtra Raj Thackeray News: त्रिभाषा सूत्राच्या आडून राज्यात पहिल्या वर्गापासून हिंदी सक्ती करण्याचा सरकारचा प्रयत्न अंगलट आला. राज्य सरकारच्या निर्णयाला कडाडून विरोध झाला. त्यामुळे सरकारने त्रिभाषा सूत्र लागू करण्यासंदर्भातील शासन निर्णय रद्द केले. या निर्णयाचे स्वागत करतानाच मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांचे अभिनंदन केले. देशपांडेंनी राज ठाकरेंचा जुना व्हिडीओ शेअर करत भावना व्यक्त केल्या.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

राज्य सरकारने त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निर्णय रद्द करण्याची मागणी करतानाच आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर हिंदी सक्तीच्या निर्णयात बदल करताना सरकारने अप्रत्यक्षपणे तिसरी भाषा हिंदी राहील अशा पद्धतीने निर्णय घेतला. त्यानंतर याविरोधात तीव्र पडसाद उमटण्यास सुरूवात झाली होती. पण, त्यापूर्वीच सरकारने त्रिभाषा सूत्र संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द केले.   

...तर पायही छाटेन, राज ठाकरेंचा व्हिडीओ, देशपांडे काय म्हणाले?     राज्य सरकारने निर्णय रद्द केल्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज ठाकरेंचं अभिनंदन करणारी एक पोस्ट केली. राज ठाकरे यांचा एक जुना व्हिडीओही संदीप देशपांडेंनी शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करताना ते म्हणाले, "साहेब, तुम्ही जे म्हणता तेच करता; मनापासून अभिनंदन."

वाचा >>हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन

राज ठाकरेंनी व्हिडीओमध्ये काय म्हटलंय?

राज ठाकरे हा स्वतःसाठी किंवा पक्षासाठी नाही. मराठी माणसासाठी म्हणून कोणाचेही पाय चाटेन. कोणाचेही पाय चाटेन मी मराठी माणसासाठी, पण मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करण्याचा जर डाव घेतला तुम्ही हातामध्ये, तर मी पायही छाटेन"

त्रिभाषा सूत्र लागू केले जाणार, पण...

राज्य सरकारने त्रिभाषा सूत्र लागू करण्यासंदर्भात काढलेले दोन्ही शासन आदेश रद्द करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली. त्याचवेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी असेही सांगितले की, "त्रिभाषा सूत्र कोणत्या वर्गापासून आणि कशा पद्धतीने लागू करायचे यासंदर्भातील निर्णय करण्यासाठी एक समिती नियुक्त करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. डॉ. नरेद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समिती याचा अभ्यास करून सरकारला अहवाल देणार आहे." 

टॅग्स :राज ठाकरेमनसेहिंदीमराठी