Join us  

Sanjay Kute: "मी कामानिमित्त सुरतला गेलो, योगायोगाने शिवसेना आमदारांची भेट झाली"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2022 4:48 PM

गुजरात आणि मग आसाम या भाजप शासित राज्यांमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) वेगळी शिवसेना (Shiv Sena) बांधणी करत होते

मुंबई - शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला. शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर, देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री बनले. मात्र, या सत्तासंघर्षात सुरत, गुवाहटी आणि गोवा येथील तीन हॉटेल चर्चेत आली. बंडखोर आमदारांसोबत भाजपचे दोन नेते गुवाहटीतील हॉटेलमध्ये दिसून आले होते. त्यापैकी, माजी मंत्री संजय कुटे आणि मोहित कंबोज यांचे फोटो व्हायरलही झाले होते. आता, संजय कुटेंच्या उपस्थिताबाबत त्यांना प्रश्न विचारला असता, तो योगायोग होता असे उत्तर त्यांनी दिले.

गुजरात आणि मग आसाम या भाजप शासित राज्यांमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) वेगळी शिवसेना (Shiv Sena) बांधणी करत होते. मात्र शिंदेंनी पुकारलेलं हे बंड नेमकं कुणाच्या पाठिंब्यानं सुरु आहे, हा प्रश्न आता जवळपास निकाली लागला आहे. शिवसेनेचे संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या पाठिमागे थेट भाजपचा हात असल्याचा आरोप केला. पण, एकनाथ शिंदे यांनी हा आरोप फेटाळला आहे. आपल्याला कोणताही भाजप नेता भेटला नाही आणि अद्याप कुणाशीही आमचं बोलणं झालेलं नाही, असे शिंदेंनी सांगितलं होतं. मात्र, सूरतहून व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये भाजप नेते मोहित कंबोज आणि संजय कुटेही दिसले. आता, आपलं तिथं असणं हा निव्वळ योगायोग होता, असे कुटे यांनी म्हटले आहे.

मी सुरतला माझ्या वैयक्तिक कामासाठी गेलो होतो, मला हे सत्तानाट्य काही माहिती नव्हत. मी नेहमीच रेडीसनला जात असतो, मला तिथं अडवण्यात आलं. तेव्हा मला समजलं की इथं काहीतरी प्रॉब्लेम आहे, तेव्हा माझे 20 वर्षांतले शिवसेना नेत्यांशी मैत्रीचे संबंध आहेत. मग, जे जुने सहकारी होते, तेच भेटले. मी आतमध्ये गेल्यानंतर मला हे सगळं माहिती पडलं, असे संजय कुटे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. तसेच, कोणी विश्वास ठेवू की नये, पण मी सांगत आहे, मग विश्वास ठेवावाच लागेल, असेही ते म्हणाले. 

मोहित कंबोजबद्दल विचारले असता, मला मोहितचं माहिती नाही. पण, शिवसेना आमदारांसोबत माझे ऋणानुबंध आहेत. त्यामुळेच, त्यांनी मला गुवाहटीतही आग्रहाने थांबवले, अशी माहिती संजय कुटे यांनी दिली.

काल म्हणाले होते एकनाथ शिंदे 

गुवाहटीतील आमदारांसोबत शिंदेंचा संवाद होतानाचा एक व्हिडिओ पाठवण्यात आला. त्यात बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे सर्वांना आवाहन करताना दिसून आले. आपल्यासोबत देशातील महाशक्ती असून कुणालाही घाबरण्याचं कारण नाही. आपण सगळे एकत्र आहोत आणि सुखदुःखात एकमेकांसोबत राहू.. असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलं होतं. 

टॅग्स :शिवसेनाएकनाथ शिंदेभाजपागौहती