लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुस्लीम प्रियकराबरोबर ‘लिव्ह इन’ रिलेशनशिपमध्ये असल्याच्या मुद्द्यावरून चेंबूर येथील सरकारी वसतिगृहात ठेवण्यात आलेल्या किशोरवयीन मुलीने आपल्याला पालकांबरोबर राहायचे नसून प्रियकराबरोबरच राहायचे आहे, असे सोमवारी न्यायालयाला सांगितले. त्यावर न्यायालयाने तिला तिचा प्रियकर सेटल होईपर्यंत वाट पाहण्याचा सल्ला दिला.
संबंधित मुलीचा प्रियकर २० वर्षांचा आहे. कायद्याने मुलाचे विवाहाचे वय २१ वर्षे आहे. त्यामुळे मी एक वर्ष वाट पाहीन, पण त्याच्याबरोबरच राहीन, पालकांबरोबर नाही, असे न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने तिला वरील सल्ला दिला. मुलगी १९ वर्षांची आहे. तिने ब्युटीशियनचा कोर्स केला आहे. ती मुलाबरोबरच लिव्ह-इनमध्ये राहते. तिने अद्याप त्याच्याशी विवाह केला नाही. मात्र, तो २१ वर्षांचा झाल्यावर त्याच्याशी विवाह करू, असे तिने न्यायालयाला सांगितले. याचिकेवरील सुनावणी न्या.भारती डांग्रे आणि न्या.मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठापुढे झाली.
लग्नानंतर उदरनिर्वाह कसा करणार?nविवाहानंतर सर्व गरजा कशा भागवणार, याचा विचार दोघांनी केला आहे का? असा सवाल न्यायालयाने दोघांनाही केला. मात्र, त्यावर दोघेही समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. nयाचिकादार आधी कॉल सेंटरमध्ये काम करत होता. त्याला दुसरा जॉब मिळेल, असे उत्तर मुलीने न्यायालयाला दिले, तर मुलाने आपण कपड्यांचा व्यवसाय सुरू केला असून, त्यातून कमाईची आशा व्यक्त केली.
प्रकरण काय?मुलीच्या पालकांच्या, बजरंग दल आणि अन्य सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रावरीवरून मुस्लीम प्रियकराबरोबर राहात असलेल्या हिंदू मुलीला सरकारी वसतिगृहात ठेवण्यात आले. त्यामुळे तिच्या प्रियकराने प्रेयसीला वसतिगृहातून सोडून तिचा ताबा पुन्हा आपल्याला द्यावा, यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली.