बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात भाजपाचे मोहित कंबोज यांचे नाव घेण्यात आले. माजी आमदार आणि बाबा सिद्दिकी यांचे सुपुत्र झिशान सिद्दिकी यांनीच हे आरोप केले आहेत. त्यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. या आरोपांवर मोहित कंबोज यांनी उत्तर दिले. ज्या दिवशी हत्येची घटना घडली, त्यापूर्वी कॉलवर काय बोलणे झाले होते, याबद्दलही त्यांनी खुलासा केला.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंबोज यांनी बाबा सिद्दिकी, त्यांची हत्या याबद्दल त्यांची भूमिका मांडली.
तुमच्या एसआरएशी संबंधित प्रश्न आहे. बाबा सिद्दिकी यांची झालेली हत्या, त्यामध्ये झिशान सिद्दिकींनी तुमचं नाव घेतले. त्यामध्ये तुमची भूमिका काय आहे? असा प्रश्न मोहित कंबोज यांना विचारण्यात आला होता.
या प्रश्नाला उत्तर देताना मोहित कंबोज म्हणाले, "बघा, आता मी खरं सांगेन. पूर्णपणे सत्य सांगेन. त्यांचा मृत्यू झाला सप्टेंबर की ऑक्टोबरमध्ये. मला आता नक्की आठवत नाहीये. मी माझ्या घरी पहिल्या मजल्यावर बसलेलो होतो. सायंकाळी साडेसहा वाजता मला बाबा सिद्दिकींचा कॉल आला होता."
पुढे मोहित कंबोज म्हणाले, "माझे आणि बाबांचे खूप चांगले संबंध होते. आतापासून नाही, तर पंधरा वर्षांपासून होते. मी दहा वर्षांपासून वांद्रेमध्ये राहतोय. त्यापूर्वीपासून आमचे चांगले संबंध होते. त्यांना मी आधीपासूनच ओळखायचो त्याचे गाव बिहारमधील आहे आणि मी उत्तर प्रदेशचा आहे."
बाबा सिद्दिकी म्हणाले, 'बुधवारी भेटू'
"बाबा सिद्दिकींचे सगळ्यांशी चांगले संबंध होते. ते मला बेटा म्हणायचे. त्यांनी मला कॉल केला आणि म्हणाले की, 'बेटा तू कुठे आहेस?' मी त्यांना म्हणालो की, बाबाभाई मी घरीच बसलेलो आहे. ते म्हणाले, 'तू मला भेट.' मी म्हणालो, भेटतो. ते म्हणाले, 'कधी भेटतो?' मी म्हणालो की, एक-दोन दिवसात आपण भेटू. ते म्हणाले की, 'आपण बुधवारी भेटू.' मीही म्हणालो की, बुधवारी भेटू", असे मोहित कंबोज यांनी मुलाखतीत बोलताना सांगितले.
"त्यांनी आणखी एक गोष्ट सांगितली की, 'आता निवडणूक येणार आहे, तर तू झिशानला मदत करशील ना?' मी त्यांना म्हणालो की, माझा भाऊ आहे, काही काळजी करू नका. मदत करेन. मला असं वाटतं की कोविडमध्ये मी झिशानला खूप जवळून बघितलं. ज्याप्रकारे बाबा सिद्दिकी आणि झिशानने धान्य वाटपापासून ते पीपीई कीट वाटप केले. इतकं मुंबईत कुठल्याच आमदाराने केले नाही", असे मोहित कंबोज म्हणाले.
टीव्ही सुरू केला आणि मला धक्काच बसला
"त्यानंतर मी घराच्या पाचव्या मजल्यावर जाऊन बसलो. त्यानंतर टीव्ही चालू केला. तेव्हा बघितलं की, बाबा सिद्दिकींचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. मला धक्काच बसला. मी स्वतःला म्हणालो की, आताच तर मी यांना बोललो. मग आशिषजींना कॉल केला. ते आणि मी आठ-सव्वा आठ वाजता लिलावती रुग्णालयात गेलो. आम्ही तिथे दोन तास होतो. त्यांच्या अंत्यसंस्काराला गेलो होतो", असेही कंबोज यांनी या मुलाखतीत सांगितले.
"सर्व काही ठीक सुरू होतं. दोन महिन्यांनी निवडणूक लागली. झिशानचा मला कॉल आला. झिशान महायुतीचाच उमेदवार होता. राजकीय मदत त्याला करायची होती. त्याला सगळी मदत केली. सर्व काही ठीक चालले होते. एक दिवस अचानक कळले की झिशान सिद्दिकीने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आणि त्यात असे म्हटले आहे की, शेवटचे बोलणे माझ्यासोबत झाले होते. मीच त्या शूटर्संना ठिकाण सांगितले आणि बोलणे झाल्यावर हे घडले आणि याची चौकशी झाली पाहिजे", असे मोहित कंबोज झिशान सिद्दिकींनी केलेल्या आरोपांबद्दल म्हणाले.
"माझा तर साधा प्रश्न आहे की, मला कॉल कुणी केला होता? मी तर बाबा सिद्दिकींना कॉल केला नव्हता. मला कॉल आला होता. सहा महिन्यानंतर मला त्यांचा कॉल आलेला. मला कॉल आलेला. मग शूटर्संना कसं सांगेन, हे पटण्यासारखेच नाहीये. मला असे वाटते की, प्रसिद्धीसाठी कोणताही व्यक्ती स्टंट करायला लागतो. मला असं वाटतं की अजून त्याला समज आलेली नाहीये", असे कंबोज झिशान सिद्दिकींच्या आरोपांवर म्हणाले.
Web Summary : Mohit Kamboj denied involvement in Baba Siddique's murder, revealing their last call. Siddique had asked for support for his son Zeeshan in the upcoming elections, just before he was shot. Kamboj expressed shock and disbelief at the news.
Web Summary : मोहित कंबोज ने बाबा सिद्दीकी की हत्या में शामिल होने से इनकार किया, उनकी आखिरी कॉल का खुलासा किया। सिद्दीकी ने आगामी चुनावों में अपने बेटे जीशान के लिए समर्थन मांगा था, इससे ठीक पहले उन्हें गोली मार दी गई थी। कंबोज ने खबर पर सदमा और अविश्वास जताया।