Raj Thackeray Latest News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काही पदाधिकाऱ्यांनी निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यांना दहीहंडीचं निमंत्रण देण्यासाठी आल्याचं या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर राज ठाकरे जवळ आले आणि असं उत्तर दिलं की त्यांनाही हसू अनावर झालं.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सध्या सगळी गोकुळाष्टमीची लगबग सुरू आहे. ठिकठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले गेले असून, गोविंदा पथकांचाही सराव जोरात सुरू आहे. हे सगळं सुरू असताना राज ठाकरेंचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो
काही पदाधिकारी राज ठाकरे यांना दहीहंडी उत्सवाचे निमंत्रण देण्यासाठी भेटले. राज ठाकरेंनी त्यांची भेट घेतली. दहीहंडी उत्सवाच्या निमंत्रणाचा मुद्दा निघाल्यावर राज ठाकरे त्यांना म्हणाले, 'दहीहंडीचं आमंत्रण...? मी फक्त मटण हंडीचं स्वीकारतो, बरका.'
राज ठाकरेंचं उत्तर ऐकून पदाधिकाऱ्यांना हसू अनावर झाले. त्यानंतर या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंना श्रीकृष्णाची मूर्ती भेट दिली आणि दहीहंडीची निमंत्रण पत्रिकाही दिली. राज ठाकरे यांच्या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.
कोणी काय खावं हे ठरवण्याचा अधिकार कुणी दिला?
राज ठाकरे यांनी मांसविक्रीच्या मुद्द्यावरूनही माध्यमांशी बोलताना स्पष्ट भूमिका मांडली. कल्याण-डोंबिवली महापालिकेने स्वातंत्र्यदिनी कत्तलखाने बंद ठेवण्याबरोबरच मांसविक्रीवरही बंदी घातली आहे. यावर राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला.
'मूळात कोणी काय खावं, हे ठरवण्याचा अधिकार महापालिकेला कुणी दिला? मी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगितले आहे की, ही बंदी पाळू नका. स्वातंत्र्य दिन म्हणून १५ ऑगस्ट साजरा करायचा आणि त्या दिवशी खायचं स्वातंत्र्य नाही, हा काय प्रकार आहे?', असा उलट सवाल राज ठाकरेंनी मांसविक्रीवरून केला.