Join us  

मी राजीनामा दिलेला नाही, राधाकृष्ण विखे-पाटलांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 1:52 PM

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटलांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिलेला नाही, असा खुलासा त्यांनी केला आहे.

मुंबई- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटलांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिलेला नाही, असा खुलासा केला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटलांनी राजीनामा द्यावा, असा दबाव काँग्रेसमधून त्यांच्यावर वाढत आहे. सुजय विखे-पाटलांनी भाजपाची वाट धरल्यानं काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मोठा धक्का बसला, पण राधाकृष्ण विखेंचंही हे मोठं अपयश मानलं जातंय.या पार्श्वभूमीवर ते विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. परंतु प्रसारमाध्यमांमध्ये राधाकृष्ण विखे-पाटलांच्या राजीनाम्यासंदर्भात उठलेल्या अफवांना त्यांनीच पूर्णविराम दिला आहे. मी अद्याप राजीनामा दिलेला नाही, असा खुलासा राधाकृष्ण विखे-पाटलांनी केला आहे. सुजय विखे-पाटलांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटलांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी नगर लोकसभा निवडणुकीत मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने प्रचार करणार नाही आणि मुलगा सुजय विखे पाटील याचाही प्रचार करणार नाही, अशी घोषणा राधाकृष्ण विखे-पाटलांनी केली होती.अहमदनगरच्या जागेवरून आघाडीत निर्माण झालेला तिढा सुटत नसल्याने वैतागलेल्या सुजय विखे पाटील यांनी भाजापमध्ये प्रवेश केला होता. त्यावरून राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर स्वपक्षीयांकडूनच टीका करण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत काँग्रेस नेत्यांशी झालेल्या बैठकीनंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ''मी अद्यापही काँग्रेसमध्येच आहे. काँग्रेसच्या पक्षनेतृत्वाशी माझी बांधिलकी आहे. त्यामुळे माझ्याबाबत पक्ष आणि पक्षनेतृत्व जो काही निर्णय घेईल तो मला मान्य असेल.'' असे विखे पाटील म्हणाले होते.सुजय विखे पाटील यांच्या भाजपामधील प्रवेशाबद्दल विचारले असता राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले होते की ''सुजय विखे पाटील यांनी मला विचारून भाजपात प्रवेश केलेला नाही. मी नगरमध्ये त्यांच्या प्रचाराला जाणार नाही. तसेच त्यांच्या विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचाही प्रचार करणार नाही.''

टॅग्स :राधाकृष्ण विखे पाटीलकाँग्रेसलोकसभा निवडणूक