Join us

मी मुंबईत आलोय, वेळ अन् ठिकाण सांगा, तिथे येतो; फिल्म निर्मात्याचे मनसेला उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 17:44 IST

हिंदी सिनेमासाठी भयमुक्त वातावरण असू द्या. हिंदी सिनेमा जगताचे नुकसान करू नका असा सल्लाही अमित जानी यांनी मनसेला दिला.

मुंबई – पाकिस्तानी महिला सीमा हैदर आणि सचिन यांच्या प्रेम स्टोरीवर आधारीत ‘कराची टू नोएडा’ या सिनेमाला मनसेने विरोध केला होता. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सिनेमाला विरोध करू असं आव्हान दिले होते. त्यावर या सिनेमाचे फिल्म निर्माता अमित जानी यांनी मनसेवर पलटवार करत मी मुंबईला येईन, तुमच्या हल्ल्याला मी घाबरत नाही असं प्रतिआव्हान दिले होते. त्यानंतर आज अमित जानी मनसेला आव्हान देत मुंबईत पोहचले आहेत.

यावेळी अमित जानी म्हणाले की, मुंबईत सिनेमासाठी कास्टिंग डायरेक्टर, कलाकार यांना साईन करायला आलोय. मी दिल्लीत बोलवू शकलो असतो पण मला मुंबईत येऊ देणार नाही, मुंबईत येऊन दाखवावे अशी धमकी दिली. त्याला विरोध करण्यासाठी मी आलोय. राज ठाकरे अयोध्येत आले नाही. म्हणून आम्ही मुंबईत आलो. अमेय खोपकर यांना सिनेमाचा कंटेट माहित नाही. मी मुंबईत आलोय, मी घरी येतो, सांगा कुठे याचचे. तुम्ही कंटेट समजून घ्या, आपण एकाच विचारधारेचे आहोत. हिंदुत्ववादी आम्हीही आहोत. वाद कुठे आहे. विनाकारण तुम्ही वाद तुम्ही करताय. सीमा हैदर भारतात आलीय, पाकिस्तान मुर्दाबादचे नारे देतेय, सीमा हैदरचा तपास यंत्रणा करेल. उगाच तिला मोकळीक दिली नाही असं त्यांनी म्हटलं.

तसेच पाकिस्तानातून महिला आलीय, ती पाकिस्तानला कंटाळली आहे. आपल्या देशात इतर देशातून लोकं आलीय, तुम्ही कहाणी ऐकावी, तुमच्या देशभक्तीच्या भावना उत्तेजित होतील. सिनेमात १५०० लोक असतात. माझे २ सिनेमा येतायेत. त्यात सर्व राज्यातील लोकं आहेत. महाराष्ट्रात शूट झाले तर त्याचा फायदा कोणाला होणार, इथल्याच लोकांना होणार आहे. हिंदुत्ववाद्यांना विरोध नको, भाषा आणि प्रांताच्या नावावर वाद नको. योगी सरकारच्या कारकिर्दीत आम्ही तिथे शुटींग करू. हिंदी सिनेमासाठी भयमुक्त वातावरण असू द्या. हिंदी सिनेमा जगताचे नुकसान करू नका असा सल्लाही अमित जानी यांनी मनसेला दिला.

दरम्यान, कलेला बंधनात बांधू शकत नाही. सचिन आणि सीमाच्या प्रेमस्टोरीवर सिनेमा आहे परंतु सीमा हैदर त्यात काम करत नाही. सीमा हैदर पाकिस्तानी आहे पण सचिन भारतीयच आहे ना...अक्षय कुमार कॅनेडियन होता मग त्याला भारतीय नागरिकत्व दिलेच आहे. त्यामुळे तुमच्या भावनांना आवार घाला. चहापेक्षा किटली गरम असा मनसेचा प्रकार आहे. अनेक कार्यकर्त्यांनी धमक्या दिल्या. मीदेखील हिंदुस्तानी आहे. मी भाषा, प्रांतवादाला मानत नाही. हिंदी सिनेमाचे नुकसान होऊ नये यासाठी यात हायकोर्टाने हस्तक्षेप करावा म्हणून याचिका केली आहे. तुम्ही महाराष्ट्रवादी असाल तर इथल्या लोकांचे नुकसान का करताय? सिनेमाचे शुटींग इथे झालं तर इथल्याच लोकांना फायदा होणार आहे. तुम्हाला सिनेमाचे कंटेट समजून घ्यायचे असेल तर आम्हाला घरी बोलवा नाहीतर तुम्ही आमच्या घरी या असं आवाहन अमित जानी यांनी अमेय खोपकर यांना केले आहे.

आपली विचारधारा एक, मग लढायचं कशाला?

मी उत्तर भारतीय असल्याने मनसेची नाराजी असू शकते. राजकीय अजेंडा असल्याने त्यांचा विरोध असेल. मी मराठी असतो तर मला बोलावून चर्चा केली असती. विखुरलेले समाज आता एकत्र येतोय. त्यामुळे त्याला विरोध करू नका. आम्ही देशाचे, धर्माचे काम करतोय. मी मुंबईत आलोय, तुम्ही या अन्यथा आम्हाला बोलवा. भारत-पाक मॅच नाही. माध्यमात बोलू नका, समोर येऊन चर्चा करू, तुमचं स्वागत करू, भगव्या शालीत तुमचा सत्कार करू, आपली विचारधारा एक, मग लढायचं कशाला, लढण्याची भीती नाही परंतु समाज विखुरला जाईल याची भीती वाटते असंही अमित जानी यांनी अमेय खोपकर यांना आवाहन केले आहे.    

टॅग्स :मनसे