Join us  

सांत्वनासाठी माझ्याकडे कोणतेही शब्द नव्हते; कुटुंबासमोर मी हात जोडून स्तब्ध उभा होतो- मुख्यमंत्री

By मुकेश चव्हाण | Published: January 11, 2021 9:49 AM

कितीही सांत्वन केलं तरीही ते परत आणता येणार नाहीत, असं उद्धव ठाकरे यांनी बालकांच्या पालकांना भेटल्यानंतर सांगितले.

मुंबई/ भंडारा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भंडाऱ्यातील रुग्णालयाची रविवारी पाहणी केली. रुग्णालयात लागलेल्या आगीत १० चिमुरड्या बालकांचा मृत्यू झाला. त्या बालकांच्या कुटुंबांचं मुख्यमंत्र्यांनी सांत्वन केलं. भंडाऱ्यातल्या घटनेची चौकशी करण्यात येईल. कोणालाही मुद्दाम आरोपी करणार नाही. पण दुर्लक्ष करणाऱ्यांना सोडणार नाही, असं मुख्यमंत्री ठाकरेंनी रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर सांगितलं.

दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या बालकांच्या पालकांना भेटलो. त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. कारण जीव गेले आहेत. कितीही सांत्वन केलं तरीही ते परत आणता येणार नाहीत, असं उद्धव ठाकरे यांनी बालकांच्या पालकांना भेटल्यानंतर सांगितले. यासोबतच पालकांचे शब्द काळीज पिळवटून टाकत होते. त्यांच्या वेदना ऐकून उद्धव ठाकरेही भावव्याकुळ झाले. ‘त्यावेळी सांत्वनासाठी माझ्याकडे कोणतेही शब्द नव्हते. केवळ या कुटुंबासमोर मी हात जोडून स्तब्ध उभा होतो,’ अशा भावना उद्धव ठाकरे यांनी या मातांच्या भेटीनंतर व्यक्त केल्या. 

उद्धव ठाकरे यांनी अशा भीषण दुःखाच्या प्रसंगी संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी असल्याचा दिलासा या दोन्ही मातांना दिला. या कुटुंबांची सर्वतोपरी काळजी घ्यावी असे आदेश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. ‘या दुर्घटनेमुळे बालकांच्या कुटुंबांची झालेली हानी कधीही भरून निघणार नाही याची मला जाणीव आहे. स्वतःचं मूल अशा पद्धतीने जाणं हे अत्यंत हृदयद्रावक आहे’ अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सहवेदना व्यक्त केल्या.

दरम्यान, दुर्घटना प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करताना कोणालाही मुद्दाम आरोपी करणार नाही. पण दुर्लक्ष करणारी व्यक्ती सुटणार नाही. या समितीची समितीची जबाबदारी विभागीय आयुक्तांकडे देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलातील वरिष्ठ अधिकारीदेखील या समितीत आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून ते मार्गदर्शक सूचना घालून देतील. भंडारा रुग्णालयातील घटनेनंतर राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहितीही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली. 

लोकमतची भूमिका- सहली नकोत, कारवाईच हवी! 

भंडाऱ्यात दहा बाळांचा करुण अंत झाल्यापासून राजकीय नेते सांत्वनाच्या नावाखाली जिल्हा रूग्णालयाला भेटी देत आहेत. मात्र, ४८ तास उलटून गेल्यानंतरही कुणावरही कारवाई झालेली नाही. जनतेला या राजकीय सहलींचा उबग आला आहे. यापुढे हे चालणार नाही. दौरे, खोटे सांत्वन, कोरडी आश्वासने आणि सहनुभूती नको, कारवाई हवी, हीच जनतेत तीव्र भावना आहे. जनतेच्या भावना हीच आमची भूमिका! तेव्हा, ‘लोकमत’नेदेखील स्पष्ट भूमिका घेतली असून राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांची छायाचित्रे, कौतुक प्रकाशित न करण्याचा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :भंडारा आगउद्धव ठाकरेमहाराष्ट्र सरकार