मुंबई : मी चोरी करण्यासाठी इमारतीत शिरलो. पण, ते अभिनेता सैफ अली खानचे घर आहे किंवा ज्याच्यावर हल्ला केला तो सैफ अली होता, हे देखील माहिती नव्हते, असा दावा आरोपी मोहम्मद शहजादने पोलिसांकडे केल्याचे समजते. मात्र, त्याच्या दाव्याबाबत पोलिस कसून चौकशी करत आहेत.
घुसखोरी करून भारतात आलेल्या शहजादला भारतीय कागदपत्रे देणाऱ्या एजंटचाही पोलिसांनी शोध सुरू केला आहे. शहजाद बांगलादेशातील बेरोजगारी आणि उपासमारीला कंटाळून सहा महिन्यांपूर्वी घुसखोरीच्या मार्गाने भारतात आला. नोकरीच्या शोधात त्याने मायानगरी मुंबई गाठली. वेठबिगारी, हाऊसकिपिंग, बारमध्ये वेटर, अशी कामे तो करत होता. तो आल्यापासूनच आपली खरी ओळख लपवून राहत होता. नावही बदलत होता.
...म्हणून मी पळ काढलाआपल्याला ते घर अभिनेता सैफ अली खानचे असल्याचे माहीत नव्हते. चोरी करण्यासाठी सद्गुरू शरण इमारतीमध्ये शिरलो. ११व्या मजल्यावर गेलो. घरात शिरलो असताना, सर्वजण जागे झाले. पकडला जाण्याच्या भीतीने मी त्यांच्यावर हल्ला करून पळ काढला. ज्याच्यावर मी हल्ला केला तो अभिनेता सैफ अली खान होता, हे माहीत नव्हते. हल्ल्याच्या बातम्या युट्यूबवर पाहिल्यानंतरच तो सैफ अली असल्याचे मला समजले, असा दावा आरोपीने पोलिसांकडे केल्याचे समजते.