लाल दिव्याची मागणी मी केली नव्हती : महापौर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 11:38 IST2026-03-17T11:38:38+5:302026-03-17T11:38:57+5:30
जो काही प्रकार घडला त्याची जबाबदारी प्रशासनाने घेतली आहे, असे तावडे यांनी संगितले. या फ्लॅश लाइट्सबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, वाहन पुरविणाऱ्या कंपनीकडूनच वाहनाचे जे काही साहित्य असते, ते आधीच वाहनात होते, असे अधिकाऱ्याने सांगितल्याचे तावडे म्हणाल्या.

लाल दिव्याची मागणी मी केली नव्हती : महापौर
मुंबई : वाहनावर लाल दिवा हवा, अशी कोणतीही मागणी मी केलेली नव्हती. प्रशासनाने जे दिले ते मी घेतले, असे महापौर रितू तावडे यांनी स्पष्ट केले.
महापौरांच्या वाहनासमोर लाल-निळ्या रंगाचे फ्लॅश लाईट्स बसविले होते. त्यावरूनच महापौर वादाच्या भोवऱ्यात सापडल्या. अर्थातच विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीका करण्याची संधी दवडलेली नाही. दिव्यावरून वादंग निर्माण झाल्यानंतर प्रशासनाने दिवे काढले. या वादंगावर स्पष्टीकरण देण्यासाठी सोमवारी मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि सभागृह नेते गणेश खणकर यांनी पालिका मुख्यालयात संयुक्त पत्रकार परिषद घेतली. जो काही प्रकार घडला त्याची जबाबदारी प्रशासनाने घेतली आहे, असे तावडे यांनी संगितले. या फ्लॅश लाइट्सबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, वाहन पुरविणाऱ्या कंपनीकडूनच वाहनाचे जे काही साहित्य असते, ते आधीच वाहनात होते, असे अधिकाऱ्याने सांगितल्याचे तावडे म्हणाल्या.
विरोधकांनी सत्तेत असताना महापौरांच्या वाहनावर लाल दिव्याची मागणी केली होती, याचा दाखला देत खणकर यांनी विरोधी पक्षाला लक्ष्य केले. रोहिंगे आणि बेकायदा बांगलादेशी यांच्यावर आम्ही कारवाई सुरू केल्याने विरोधी पक्ष अस्वस्थ झाला आहे, अशी टीकाही त्यांनाही केली.
हो, सुरक्षा रक्षक पाहिजेतच!
महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून लोकांची कामे होत आहेत. रोज ३०० ते ४०० लोक भेटायला येतात, त्यामुळे महापौर कार्यालयात गर्दी वाढत असून, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात यावी, असे पत्र आयुक्तांना दिल्याचे महापौरांनी सांगितले.