मुंबई : मुंबै बँकेच्या संचालकपदी निवड झाल्यानंतर उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेचे पेव फुटले होते. मात्र, माझी संचालकपदी निवड झाली म्हणून त्याला कुणीही राजकीय रंग देऊ नका. मी आजही उद्धव ठाकरेंसोबत असून त्यांच्यासाठीच काम करीत आहे, असे स्पष्ट करत घोसाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला.
घोसाळकर यांनी काही दिवसांपूर्वी उद्धवसेनेतील पदांचा राजीनामा दिला होता. त्यामुळे त्या पक्षांतर करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी ‘मातोश्री’वर माजी नगरसेवकांच्या झालेल्या बैठकीत त्यांनी उपस्थितीही लावली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मुंबै बँकेच्या संचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर त्या पक्ष सोडणार, अशी पुन्हा चर्चा सुरू झाली. त्यासंदर्भात घोसाळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
संचालकपदाच्या निवडीला प्रसारमाध्यमांनी वेगळे वळण लावले. पक्षात नाराज होते, पण उद्धव ठाकरे यांना भेटल्यानंतर त्यांनी माझी नाराजी दूर केली. त्यामुळे मी अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहे. ते माझे कुटुंबप्रमुख आहेत. मला कोणत्याही पक्षाकडून ऑफर आलेली नाही, असे सांगत मी दुसऱ्या कुठल्याही पक्षात प्रवेश करण्याचा विचार केलेले नाही, असेही त्या ठामपणे म्हणाल्या.
‘राजकारण आणि सहकार दोन्ही क्षेत्रे वेगळी’
राजकारण आणि सहकार ही दोन्ही क्षेत्रे वेगवेगळी असून ही दोन्ही क्षेत्रे बाजूला ठेवून येत्या काळात समाजकारणाचे काम करणार आहे. यापूर्वी वेगवेगळ्या क्षेत्रात काम केले आहे.
आता सहकार क्षेत्रात पहिल्यांदाच काम करत आहे. अभिषेक घोसाळकर हे दोन टर्म येथे संचालक होते. त्यांचा सहकार क्षेत्राचा अभ्यास खूप होता. त्यामुळे आपण देखील चांगले काम करण्याचा प्रयत्न करू, असे तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या.
सहकार क्षेत्रात आपण काम करावे हे अभिषेक यांचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्या म्हणाल्या.