Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मी घराणेशाहीचा पाईक; कुटुंबव्यवस्था न मानणाऱ्यांनी आम्हाला सांगू नये", उद्धव ठाकरेंचा नरेंद्र मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2023 21:18 IST

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळाव्याला संबोधित केले.

मुंबई : घराणेशाहीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. मी घराणेशाहीचा पाईक आहे. मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे. कुटुंबव्यवस्था न मानणाऱ्यांनी घराणेशाहीविषयी आम्हाला सांगू नये, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळाव्याला संबोधित केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात शिंदे गटावर, नरेंद्र मोदींवर आणि भाजपावर घणाघाती टीका केली आहे. उद्या आपले सरकार येणार आहे. आमच्या लोकांना त्रास देऊ नका. पंतप्रधान मोदींनी मणिपूरमध्ये जावं आणि हनुमान चालिसा म्हणावी. भाजपने सगळे कावळे गोळा केले आहेत. त्यामुळे आपले सरकार नक्की येणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

याचबरोबर, उद्धव ठाकरे यांनी घराणेशाहीवर भाष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. मी घराणेशाहीचा पाईक आहे. मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे. कुटुंबव्यवस्था न मानणाऱ्यांनी घराणेशाहीविषयी आम्हाला सांगू नये, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींनी टोला लगावला. तसेच, मोदी सरकार गेलेच पाहिजे. पाशवी बहुमत असेलेले सरकार नको असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर घणाघात केला.  

मनोज जरांगे पाटील यांचे कौतुकठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या आपल्या भाषणात बोलताना सर्वात आधी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचे कौतुक केले. मनोज जरांगे पाटील यांचे शांततेत आंदोलन सुरु होते. मात्र या डायर सरकारने जालियनवालाप्रमाणेच या शांततेत सुरु असलेल्या आंदोलनावर लाठी हल्ला केला. मी त्या सगळ्या लोकांची भेट घेतली आणि वेदना जाणून घेतल्या असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. जालन्याच्या अंतरवली सराटे गावात मनोज जरांगे यांच्या उपोषणावेळी लाठीचार्ज झाल्यानंतर आपण तिथे गेलो होतो. तिथे एका घरात थांबल्यावर आपल्या आयुष्यातील सर्वात भावनिक प्रसंग काय होता, या विषयी उद्धव ठाकरे यांनी जाहिरपणे भाष्य केले. यावेळी त्यांनी शिंदे सरकारवर सडकून टीका केली.

टॅग्स :उद्धव ठाकरेदसराशिवसेना