Join us

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार हे मला आधीच माहित होतं, संजय शिरसाट यांनी सांगितली पडद्यामागची गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 23:33 IST

एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आमदार म्हणून ओळखले जाणारे संजय शिरसाट यांनी मात्र आता वेगळाच दावा केला आहे. 

मुंबई-

राज्यात राजकीय महानाट्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि आता याला बराच काळ लोटला आहे. शिंदे सरकारही आता स्थिरस्थावर झालं आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस राज्याचा कारभार सांभाळत आहेत. पण एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी घोषणा जेव्हा झाली तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण फडणवीस मुख्यमंत्री आणि शिंदे उपमुख्यमंत्री होतील अशीच अटकळ होती. शिंदे मुख्यमंत्री होणार आहेत याची कल्पना कुणालाच नव्हती असंही अनेकांनी आतापर्यंत सांगितलं आहे. पण एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे आमदार संजय शिरसाट यांनी मात्र आता वेगळाच दावा केला आहे. 

एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होणार आहेत हे मला आधीच माहित होतं, असा दावा आमदार संयज शिरसाट यांनी केला आहे. 'लोकमत ऑनलाइन'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत शिरसाट यांनी हे गुपीत सांगितलं आहे. भाजपा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करेल याची कल्पना तुम्हाला होती का? असं विचारलं असता शिरसाट यांनी गौप्यस्फोट केला आहे. "हो मला माहित होतं. तुम्ही मला एकनाथ शिंदे यांच्या जवळचे समजता ना. मग ही गोष्ट मला माहितीच होती. एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार हे मला आधीच माहित होतं", असं संजय शिरसाट म्हणाले. 

काय म्हणाले संजय शिरसाट? पाहा...

"आम्हाला मुख्यमंत्रीपदाची लालसा नव्हती. आमचं एकच मत होतं की काँग्रेस-राष्ट्रवादीपासून विभक्त व्हायचं. तेच आमचं लक्ष्य होतं. आता जे मंत्री झालेत ते याआधीही त्याच खात्याचे मंत्री होते. आम्ही काही वेगळं केलं नाही. पण काँग्रेस-राष्ट्रवादीमुळे जो मतदार आमच्यापासून दूर जात होता तो आता जवळ यायला लागला आहे. सत्तेपेक्षा आम्हाला आमचा मतदार महत्वाचा वाटत होता. यामुळे काम करण्यासाठीही स्वातंत्र्य मिळालंय", असंही संजय शिरसाट म्हणाले. 

टॅग्स :संजय शिरसाटएकनाथ शिंदे