Hyderabad Encounter: कठोर शिक्षा व्हावी, पण कायद्यानेच!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 03:58 AM2019-12-07T03:58:08+5:302019-12-07T04:01:14+5:30

पुरावे भक्कम असतील तर कोणताच आरोपी निर्दोष सुटणार नाही. काहीही झाले तरी शिक्षा कायद्यानेच व्हायला हवी, अशी मुंबईकरांची भावना आहे.

Hyderabad Encounter: There should be harsh punishment, but only by law! | Hyderabad Encounter: कठोर शिक्षा व्हावी, पण कायद्यानेच!

Hyderabad Encounter: कठोर शिक्षा व्हावी, पण कायद्यानेच!

Next

हैदराबाद येथील बलात्कार प्रकरणातील चार आरोपींचा पोलिसांनी एन्काउंटर केला़ या घटनेविषयी मुंबईकरांच्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत़ प्रतिक्रिया नोंदविताना महिला व तरुणींचा रोष त्यांच्या शब्दांतून स्पष्टपणे जाणवला़ डॉक्टर तरुणीसोबत झालेला प्रकार कोणासोबतही होऊ नये़ प्रत्येक मुलीच्या संरक्षणाची जबाबदारी समाजातील सर्वच घटकांची आहे़ पोलीस, प्रशासन, सरकार, राजकीय नेते यांपैकी कोणीच आरोपीला पाठीशी घालता कामा नये, असा दमही काही महिलांनी यानिमित्ताने दिला आहे़ काहीही झाले तरी घटना दुर्दैवीच आहे़ आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे़ मात्र शिक्षा देण्याचे काम पोलिसांचे नाही़ त्यांनी तपास करावा व सबळ पुरावे कोर्टात सादर करावेत. पुरावे भक्कम असतील तर कोणताच आरोपी निर्दोष सुटणार नाही़ काहीही झाले तरी शिक्षा कायद्यानेच व्हायला हवी, अशी मुंबईकरांची भावना आहे़

अशा प्रकारे झालेल्या एन्काउंटरमध्ये जे मारले गेले, ते खरेच आरोपी होते का? याची शहानिशा होणे गरजेचे होते. त्यांच्या या अशा घाणेरड्या कृतीमागे कोणाचा दृष्ट हेतू होता का? त्यांना सुपारी देऊन हा प्रकार केला गेला होता का? अंतर्गत शत्रुत्व व सूड हे गुन्ह्यामागचे हेतू होते का? यांना शासन मृत्युदंड हेच आहे; पण अशा रीतीने गुन्हेगार संपवून मूळ गुन्हेगार सुटणार तर नाही ना, या संशयास कुठेतरी जागा राहते. त्यांच्यावर जलदगती न्यायालयात खटला चालविणे योग्य वाटते व गुन्हा सिद्ध झाल्यावर दया-माया न दाखविता भर चौकात उभे करून देहदंड देणे उचित वाटते.
- चेतन साळवी,
अध्यक्ष, मुलुंड जिमखाना.

हैदराबाद पोलिसांनी केलेले एन्काउंटर संशयास्पद वाटतात. खरेतर हे कायद्याला धरून नाही. यामुळे न्यायप्रक्रियेवर लोकांचा विश्वास राहणार नाही. त्यामुळे आरोपींची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
- प्रमोद कांदळगावकर, मुंबईकर.

बलात्कार आणि छेडछाड करणाऱ्या नराधमांना भर चौकात ठेचून मारले पाहिजे, तरच अशा आरोपींना अद्दल घडेल. कायद्यात असलेल्या फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीची गरज अशा घटनांमधून वेळोवेळी जाणवते.
- गणेश सांडभोर पाटील, साठ्ये महाविद्यालय, विलेपार्ले (मुंबई).

बलात्कारासारख्या घटना एक माणूस म्हणून लाजवतील अशा आहेत. अशी कितीतरी प्रकरणे न्यायालयात निकालाची वाट पाहात आहेत. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन सर्व प्रकरणे निकाली लावून दोषींवर कडक कारवाई केली पाहिजे.
- डॉ. आदेश चोपडे, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय.

पोलिसांनी कायदेशीर मार्गाने जायला हवे होते; अन्यथा भविष्यात लोकांचा कायद्यावर विश्वास राहाणार नाही. एन्काउंटरबाबत ते योग्य होते की अयोग्य, हे लवकरच समजेल. न्यायालयाने दिलेला निर्णय अंतिम असतो. शासनाने फास्ट टॅÑकवर अशा गुन्ह्यांच्या बाबतीत कालमर्यादा ठरविली पाहिजे. फास्ट ट्रॅकमध्ये जे निर्णय दिले जातात, त्यासाठीही ठरावीक मुदत ठरविली पाहिजे. सामान्य नागरिक पोलिसांचे कौतुक करीत आहेत; परंतु यामुळे न्यायालयावरचा विश्वास उडणार नाही, याची खबरदारी घ्यायला हवी.
- नरेश दहिबावकर, अध्यक्ष, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती.

आता खरी लोकशाही आली, असे वाटू लागले आहे. देशाचा वेळ, पैसा आणि पीडित ताईचे कुटुंब व आपल्या सर्वांचा मानसिक त्रास कमी केल्याबद्दल पोलिसांचे करावे तेवढे कौतुक कमीच. तरीसुद्धा आम्हाला कायदा कठोर करून हवा आहे, जेणेकरून पुन्हा कोणीही असे कृत्य करण्यास धजावणार नाही.
- एडलीन फर्नांडिस,
विद्यार्थिनी, साठ्ये महाविद्यालय.

असे वाईट कृत्य करणाऱ्यांना ताबडतोब मारून टाकले पाहिजे. प्रत्येकाला मुली, महिलांचा आदर करणे शिकवायला हवे. प्रत्येकाने नागरी भान जपले पाहिजे.
- श्रुती रसाळ,
विद्यार्थिनी, मुंबई विद्यापीठ.

अत्याचाराच्या घटना वाईटच आहेत. अशा घटनांतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हायलाच हवी, असे म्हणणे नागरिक वारंवार मांडतात. हैदराबाद येथील एन्काउंटरचे सर्वच स्तरातून स्वागत होत असतानाच न्यायप्रक्रियाही तेवढीच महत्त्वाची आहे.
- सुभाष मराठे-निमगावकर, अध्यक्ष, सावित्रीबाई फुले घरेलू कामगार संघटना.

सामाजिक मानसिकता आणि न्यायप्रक्रिया हे दोन्ही घटक महत्त्वाचे आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बलात्काराची घटना निंदनीय असून, अशा प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे.
- राकेश पाटील, मुंबईकर.

अत्याचाराच्या अनेक घटना घडतात. आपली न्यायालयीन प्रक्रिया योग्य आहे. मात्र, खटल्यांची संख्या जास्त असल्याने न्याय मिळायला वेळ लागतो. त्याचा फायदा गुन्हेगार घेतात. एखादी पळवाट शोधतात. पुरावे नष्ट करतात. कित्येक गंभीर गुन्ह्यांतील गुन्हेगार आज मोकाट फिरत आहेत. त्यामुळे आज हैदराबाद पोलिसांनी जी कारवाई केली, तो योग्यच आहे.
- आरती आंग्रे, मुंबईकर

पोलिसांनी वेळेवर
कारवाई केली असती, तर कदाचित हा गुन्हा टाळता आला असता. मात्र, पोलिसांनी आपल्यावरील टीका व जबाबदारी टाळण्यासाठी हा मार्ग अवलंबला आहे. पोलिसांनी एन्काउंटरमध्ये मारलेले आरोपी या गुन्ह्यातील खरे आरोपी होते की
नाही, याची चौकशी करण्याची
गरज आहे. अनेकदा पोलीस आपल्यावरील टीकेचा भडिमार रोखण्यासाठी खोटे आरोपीदेखील समोर आणतात.
- सुरेंद्र बाजपेयी,
कायदा सल्लागार.

बलात्कारासारख्या गुन्ह्यातील गुन्हेगारांना तर कठोर शिक्षा होणे अत्यंत गरजेचे आहे. ज्यामुळे समाजात नागरिकांनासुद्धा समजेल की, आपण जर काही चुकीचे केले, तर समाज, न्यायव्यवस्था आपल्याला माफ करणार नाही.
- अनिल बागडे, सहायक शिक्षक,
दालमिया महाविद्यालय.

विकृतांना लवकर शिक्षा मिळाली याचा खूप आनंद आहे, पण खरेतर अशा लोकांचे चारचौघात डोळे काढून, त्यांचे नाक छाटून, हात-पाय छाटून त्यांच्या कानात गरम तेल टाकले पाहिजे. त्यामुळे हे असे लोक तडफडून मरतील.
- सायली शिंदे, विद्यार्थिनी, डहाणूकर महाविद्यालय.

हैदराबादमध्ये डॉक्टरवर बलात्कार प्रकरणातील आरोपींचे पोलिसांना एन्काउंटर करावे लागले, कारण ते पळून जात होते. असे करणे चुकीचे आहे. देशात कायद्याचे पालन करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. कायदा हाती घेऊ नये.
- गन्नारपू शंकर, सदस्य, आॅल इंडिया ह्युमन राइट्स असोसिएशन.

आता अत्याचाराच्या अनेक घटना घडत आहेत. कायद्याचा धाक राहिला, असे वाटत नाही. हैदराबाद अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांचा एन्काउंटर करण्यात आला. त्यामुळे इतर गुन्हेगारांमध्ये जरब बसेल.
- सीमा खंडाळे, सामाजिक कार्यकर्त्या.

हैदराबाद अत्याचार प्रकरणातील आरोपी हे दोषी असल्याचे न्यायालयात सिद्ध झाले नव्हते. ते जर दोषी नसतील आणि त्यांचे एन्काउंटर झाले असेल, तर तो अन्याय होईल.
- डॉ. संजय डोळस, प्रमुख वैद्यकीय अधिकारी,
माँ रुग्णालय, मनपा.

एन्काउंटर दिलासादायक असले, तरी कुठेतरी न्यायालयीन प्रक्रिया ही वेळखाऊ आणि बलात्कार पीडित तरुणीला व नातेवाइकांना मानसिक ताप देणारी आहे.
- डॉ. आकृती पाचपिंडे, पशुवैद्यकीय महाविद्यालय.

हैदराबाद अत्याचार प्रकरणातील आरोपींचे पोलिसांनी केलेले एन्काउंटर देशासाठी अशोभनीय आहे. पोलिसांनी आरोपींना पकडले, परंतु शिक्षा देण्याचे काम न्यायालय करते. न्यायालयावर लोकांचा विश्वास आहे. पोलिसांचा नाही का, पोलिसांनी रात्री एन्काउंटर करून महत्त्वाचे धागेदोरे संपविण्याचा प्रयत्न तर केला नाही ना, अशी शंका येते.
- संतोष सांजकर, वकील.

हैदराबाद अत्याचार घटनेतील आरोपी पळून जात असल्याचे कारण देत, पोलिसांनी त्यांचे एन्काउंटर केले. जर ते खरे गुन्हेगार असतील, तर ते योग्य आहे, परंतु गोळी झाडून त्यांना जखमीही करता आले असते, तसे का केले नाही, याचाही तपास व्हायला हवा.
- रोहन जाधव, मुंबईकर.

लोकांचा आक्रोश पाहता, आता तरी न्यायव्यवस्थेने जागे व्हावे आणि जिथे कुठे अशी किळसवाणी घटना घडेल, त्यावर लवकर आणि कठोर कार्यवाही करावी, हीच अपेक्षा जनतेची न्यायदेवतेकडे आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी सरकार आणि पोलीस यंत्रणा आहेच, पण त्यासोबत देशात बलात्कारविरोधी भक्कम कायदे बनविले गेले पाहिजे.
- सचिन कृष्णा तळे, नवोदित लेखक.

आरोपींचा गुन्हा सिद्ध करणे व त्यांना कठोर शिक्षा देणे हे न्यायालयाचे काम आहे. मात्र, अशा घटनांमुळे न्यायालयाचे महत्त्व अशा प्रकारांतून कमी होण्याची भीती आहे.
- मुमताज शेख, सामाजिक कार्यकर्त्या, कोरो.

संविधानाने आरोपीला गुन्हेगार आहे का, हे ठरविण्यासाठी व शिक्षा देण्यासाठी न्यायालयांची निर्मिती केलेली आहे. बलात्कार पीडितेला लवकर न्याय मिळवून देण्यासाठी जलदगती न्यायालयात खटला चालवून दोषींना कठोर शिक्षा करण्याची गरज होती. मात्र, तो अधिकार पोलिसांनी हिरावून घेणे म्हणजे न्यायालयाच्या अधिकारांवरील अतिक्रमण ठरेल.
- अ‍ॅड. नफिसा गिरकर.

न्याय मिळण्यास विलंब होत असल्याने आरोपींना कायद्याची भीती उरलेली नाही. न्यायालयाच्या विलंबामुळे असे प्रकार वाढीस लागले आहेत. पोलिसांनी जी शिक्षा या आरोपींना दिली आहे, तशीच शिक्षा बलात्कार प्रकरणातील मोठ्या आरोपींनादेखील द्यायला हवी.
- नितीश छेडा, सीईओ, हेल्पिंग हँड युथ फाउंडेशन.

बलात्कार झाल्यावर आरोपींना शिक्षा मिळण्यास खूप उशीर लागतो. मात्र, हैदराबाद पोलिसांनी केलेल्या एन्काउंटरमुळे भविष्यात अशा घटनांना चाप बसेल. अशा प्रकारचा गुन्हा करणाऱ्यांना चाप बसेल. हैदराबाद पोलिसांनी चांगला आणि योग्य निर्णय घेतला. यामुळे हैदराबाद पोलिसांचे अभिनंदन. लोकांचा उद्रेक पाहून घेतलेला हा निर्णय होता.
- प्रवीण घाग, गिरणी कामगार नेते.

कायदे असताना पोलिसांनी कायदा हातात घेणे चुकीचे आहे. हैदराबादमधील घटना दुर्दैवी आहेच. पोलीस एन्काउंटर करतात, तर गुंड आणि पोलिसांमध्ये फरक काय. मात्र, पोलिसांनी न्यायालयीन प्रक्रियेमधून जायला हवे होते. लोकशाही मार्गाने जायला हवे होते. सरकारने लक्ष घालणे गरजेचे आहे. पोलिसांसोबत शाळेमध्ये मुलांचेही समुपदेशन होणे आवश्यक आहे.
- एकनाथ माने, घर कामगार संघटना, अध्यक्ष.

एन्काउंटर योग्यच आहे. कायदेशीर मार्गाने गेल्यास सुनावणी, न्याय मिळणे, यास बराच उशीर होतो. हाताळणीची प्रक्रिया योग्य नसते. यामुळे अशा गोष्टींवर वचक बसविण्यासाठी पोलिसांनी केले ते योग्यच केले. कायद्याच्या वेळखाऊ प्रक्रियेत न्यायाची प्रतीक्षा करावी लागणे, हे योग्य नाही. शिक्षा वेळेवर झालीच पाहिजे, वेळ निघून गेल्यावर त्याला अर्थ राहात नाही.
- अतुल जैन, समाजसेवक.

 

 

Web Title: Hyderabad Encounter: There should be harsh punishment, but only by law!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.