डोंगराळ परिसरात होतेय उमेदवारांची दमछाक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 04:32 AM2019-10-18T04:32:14+5:302019-10-18T04:32:31+5:30

अर्ध्यावरच होतोय प्रचार : तर काही जण फिरवताहेत पाठ

The hustle and bustle of the candidates in the hills | डोंगराळ परिसरात होतेय उमेदवारांची दमछाक

डोंगराळ परिसरात होतेय उमेदवारांची दमछाक

Next

मुंबई : मुलुंड, भांडुप, विक्रोळी येथील डोंगराळ परिसरात भर उन्हात चढउतारामुळे उमेदवारांची दमछाक होत आहे़ प्रचार अर्ध्यावरच होत असल्याचे चित्र पाहावयास मिळते आहे. तर काहींनी स्थानिक कार्यकर्त्यांनाच हेरून त्यांना या भागात प्रचारासाठी नेमले आहे.


मुलुंडमध्ये मुलुंड कॉलनी, अमरनगर, न्यू राहुलनगरसह भांडुपमध्ये रमाबाईनगर, टेंभीपाडा, रमाबाई नरदासनगर, कोकणनगर, साईविहार, हनुमाननगर, रामनगर तर विक्रोळीत सूर्यानगर परिसरात डोंगराळ भागात वस्त्या आहेत. या भागात हजारो कुटुंबे वास्तव्यास आहेत. पाणी, शौचालयाच्या मूलभूत समस्यांबरोबर विविध परिस्थितींना स्थानिकांना तोंड द्यावे लागते. मात्र, उन्हाच्या वाढत्या पाऱ्यामुळे उमेदवाराची या भागात टोकापर्यंत पोहोचण्याआधीच दमछाक होताना दिसत आहे. त्यामुळे पर्यायी अर्ध्यावरच प्रचार थांबवून पुढे उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून प्रचार सुरू आहे. तर, ही दमछाक टाळण्यासाठी काहींनी शक्कल लढवत थेट चौकातच सभा घेऊन मतदारांना खाली उतरवले आणि त्यांच्याकडे मतदानासाठी गळ घालण्यात येत असल्याचे चित्र गुरुवारी पाहावयास मिळाले.


मात्र काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या साफसफाईमुळे अनेकांनी अशा सभांमध्ये येण्यासाठी पाठ फिरवली. पर्यायी कार्यकर्त्यांनाच बसवून सभेचा आव आणला जात असल्याचे चित्रही मुलुंडमध्ये पाहावयास मिळाले. तर भांडुप, विक्रोळीमध्येदेखील हीच परिस्थिती कायम आहे. काही उमेदवार पोहोचले, तर काही जण कार्यकर्त्यांमार्फत अशा ठिकाणी फिरत आहेत.
कमी वेळात सर्व मतदारांपर्यंत पोहोचणे शक्य नाही. त्यामुळे पर्यायी अर्ध्यावरच चौकसभा घेत मतदारांपर्यंत पोहोचत असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे येथील मतदारराजा कुणाच्या बाजूने कौल देतो हे पाहणे महत्त्वाचे आहे.


मतदारांच्या घरी व्यक्तिगत भेटी
मुंबई : घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपचे राम कदम, काँग्रेसचे आनंद शुक्ला आणि मनसेचे गणेश चुक्कल यांच्यात चुरस रंगली असून, येथील मराठी मतांव्यतिरिक्त उर्वरित भाषिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून जोरदार प्रचार, प्रसार करत मतदारांच्या घरी दाखल होत त्यांची व्यक्तिगत भेट घेण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून केला जात आहे. ‘आमचं ठरलंय...’ म्हणत उमेदवारांकडून एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
राम कदम यांच्याकडून टायटन शोरूम, भावडी वाली चाळ, भीमनगर झोपडपट्टी, सिद्धार्थ नगर, गोळीबार रोड, जैन मंदिर, जय मल्हार सोसायटी, जांभळी नाका परिसरात जोरदार प्रचार केला जात आहे. सकाळी आणि सायंकाळी प्रचार सुरू असतानाच दुपारी नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला जात आहे. गणेश चुक्कल यांच्याकडून जाहीर सभांवर भर दिला जात आहे. शुक्रवारी मनसे नेते बाळा नांदगावकर यांची गणेश मैदान येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. आनंद शुक्ला यांच्याकडून मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत़


दारोदारी प्रचार
मुंबई : अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात एकूण ८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपचे विद्यमान आमदार अमित साटम व काँग्रेसचे उमेदवार व माजी आमदार अशोक जाधव यांच्यात चुरशीची लढत आहे. मनसेचे किशोर राणे, एमआयएमचे आरिफ शेख यांच्यात प्रमुख लढत आहे.
भाजप-शिवसेना-रिपाइंं-रासप महायुतीचे उमेदवार अमित साटम यांनी डोअर टू डोअर प्रचार करून मतदारसंघ पिंजून काढला आहे. सकाळ-संध्याकाळ प्रचार फेºया व रात्री बैठका, गाठीभेटी असा साटम यांचा सिलसिला सुरू आहे. महायुतीचे इतर घटक पक्ष त्यांच्या प्रचारात हिरीरीने सहभागी होत आहे. गुरुवारी सकाळी १० वाजता पानेरी शॉप-गावठाण-शांतावाडी- मुकुंद लेन-जे.पी. रोड-भरडावाडी-दाऊद बाग या भागात त्यांनी प्रचारफेरी काढली. तर रात्री ७ वाजता म्हातारपाडा, रात्री ८ वाजता नेहरूनगर या भागात त्यांनी प्रचारफेरी काढली. या वेळी भाजप अंधेरी पश्चिम मंडळ अध्यक्ष दीपक कोतेकर, शिवसेनेचे अंधेरी पश्चिम विभाग संघटक संजय कदम उपस्थित होते.
काँग्रेसचे उमेदवार अशोक जाधव हे २००९ ते २०१४ या काळात येथील आमदार होते. सकाळ-संध्याकाळी प्रचारफेºया, रात्री विविध जाती-धर्मांच्या नागरिकांबरोबर बैठका असा रोज सुमारे १८ ते २० तास त्यांचा व्यस्त कार्यक्रम आहे. गुरुवारी सायंकाळी ४ ते रात्री १० पर्यंत अशोक जाधव यांनी ए.बी. नायर रोड, जुहू गावठण व अन्य प्रभागात प्रचारफेरी काढली.


प्रचार फेरीत उतरले मढ ग्रामस्थ
मुंबई : मालाड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रमेशसिंह ठाकूर यांच्या बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या प्रचारफेरीत ग्रामस्थ व कोळी महिला मोठ्या संख्येने उतरल्या होत्या. या वेळी आमदार म्हणून निवडून आल्यावर स्थानिक खासदार गोपाळ शेट्टी यांच्या मार्गदर्शनात येथील प्रश्न सोडविण्याचे आणि सर्वांगीण विकास करण्याचे आश्वासन ठाकूर यांनी दिले.
खासदार गोपाळ शेट्टी व स्थानिक नगरसेविका संगीता संजय सुतार यांच्या कामावर खूश असलेल्या मच्छीमार बंधू-भगिनींनी व सर्व जाती-धर्माच्या नागरिकांनी कोळी बँडच्या तालावर नाचत मिरवणूक काढली. महिलांनी ठिकठिकाणी ओवाळून रमेशसिंह ठाकूर यांचे स्वागत केले. मढ चर्चपासून ही मिरवणूक सुरू होऊन चिश्चिन पाडा, डोंगर पाडा, मराठी आळी, मार्केट, वटार गल्ली, मधला पाडा, भोतकर गल्ली, दर्या गल्ली, बाजे गल्ली, वांजरे गल्ली, नवानगर, लोचर गाव, पातवाडी, मढचे शिवाजीनगर, धोंडीपाडा, जेट्टी येथे संपली. या मिरवणुकीत खासदार गोपाळ शेट्टी, शिवसेना विभाग प्रमुख सुधाकर सुर्वे, स्थानिक नगरसेविका संगीता संजय सुतार, शिवसेनेचे पदाधिकारी अनिल भोपी, समाजसेवक संजय सुतार, किरण कोळी, भाजपचे युनुस खान तसेच मच्छीमार संघटनांचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. ठिकठिकाणी चौक सभाही घेण्यात आल्या़

Web Title: The hustle and bustle of the candidates in the hills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.