पर्यावरणाच्या ऱ्हासाला मनुष्यच कारणीभूत; राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 12:32 IST2026-02-20T12:31:23+5:302026-02-20T12:32:27+5:30
तीन दिवसीय ‘मुंबई क्लायमेट वीक’चा समारोप

पर्यावरणाच्या ऱ्हासाला मनुष्यच कारणीभूत; राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे प्रतिपादन
मुंबई : भारतीय संस्कृती ही निसर्गपूजक आहे. प्राचीन शिक्षणपद्धतीत मुलांना निसर्गाच्या सान्निध्यात शिक्षण दिले जात होते. मात्र, आधुनिक काळात भोगवादी प्रवृत्ती वाढल्याने पर्यावरणाचा ऱ्हास झाला. आहे. कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये माणूस घरात राहिल्याने नद्या स्वच्छ झाल्या, आकाश निर्मळ दिसू लागले. यावरून पर्यावरणाचा ऱ्हास होण्यात मानवी हस्तक्षेपच प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट होते, असे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी नमूद केले.
बीकेसीमधील जिओ वर्ल्ड सेंटर येथे पार पडलेल्या ‘मुंबई क्लायमेट वीक’च्या गुरुवारच्या समारोप कार्यक्रमात आचार्य देवव्रत बोलत होते. कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, महापौर रितू तावडे, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव जयश्री भोज, राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे, सहसचिव एस. राममूर्थी, प्रोजेक्ट मुंबईचे शिशिर जोशी, जलज दानी उपस्थित होते.
नैसर्गिक शेतीला चालना
आचार्य देवव्रत यांनी रासायनिक खतांचा अतिवापर, युरिया, डीएपी आणि कीटकनाशकांमुळे ‘नायट्रस ऑक्साईड’सारख्या वायूंचा पर्यावरणावर होणारा घातक परिणाम अधोरेखित केला. रसायनांचा अंश भूजल आणि अन्नसाखळीत जाऊन गंभीर आजार होतात.
रासायनिक शेतीमुळे जमीन अनुपजाऊ होत आहे. नैसर्गिक शेतीमुळे जमिनीची सुपीकता, सेंद्रिय कार्बन आणि भूजलसाठा वाढतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘राष्ट्रीय प्राकृतिक कृषी मिशन’च्या माध्यमातून नैसर्गिक शेतीला चालना दिल्याचे त्यांनी सांगितले.
‘पर्यावरणाचा समतोल महत्त्वाचा’
पर्यावरणविषयक परिषदांमधील चर्चा केवळ बौद्धिक पातळीवर न राहता त्याची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणावर झाली पाहिजे, अशी आशा व्यक्त करून, मुंबई क्लायमेट वीकमुळे विविध देशांतील तज्ज्ञांशी विचारविनिमयाची संधी मिळाल्याबद्दल पंकजा मुंडे यांनी समाधान व्यक्त केले.
तर शहराचा विकास, वाढ आणि पर्यावरण, हवामानाची जबाबदारी या एकमेकांपासून वेगळ्या न ठेवता समांतर आणि समन्वयाने पुढे नेण्याची आवश्यकता असल्याचे महापौर रितू तावडे यांनी सांगितले.