Join us

तो 'वेडा' काही तासांतच 'शहाणा' झाला, साताऱ्यात डोंगराच्या पायथ्याशी दिसली 'माणुसकी'

By महेश गलांडे | Updated: January 27, 2021 10:14 IST

कोई भी आदमी पैदाईशी गुन्हेगार नही होता, हालात उसे मजबूर कर देते है, हा डायलॉग आपण अनेक चित्रपटांत पाहिला, ऐकला असेल. अगदी तसेच, अनेकांची परिस्थिती त्यांना वेड्यासारखं जीवन जगायला भाग पाडते.

ठळक मुद्देअभिजीत यांचे सासरे तीन दिवसांपासून या व्यक्तीला केशकर्तनायलात घेऊन जायचा प्रयत्न करत होते,पण तो राजी होत नव्हता. मात्र, अभिजीत यांनी त्या व्यक्तीच्या शेजारी त्यांच्या मुलासह आणखी एका व्यक्तीला बसवून फोटो काढला.

सातारा/मुंबई - दाढी वाढलेला, अंगावर मळकट कपडे असलेला आणि कित्येक महिन्यांपासून अंघोळीच्या पाण्याशी संबंध न आलेला व्यक्ती पाहिला की, तो वेडा ठरवायला आपल्याला काही मिनिटही लागत नाहीत. मग, या वेड्यांची टिंगल-टवाळी करणं, त्यांना दगड मारणं, त्याला शिव्या देणं हा जणू आपण आपला अधिकारच समजतो. आपल्या संवेदनाहीन कृतीतून आपण काय करतोय हेही आपल्याला समजत नाही. मात्र, थोडी दृष्टी बदलली तर बदल कसा होतो, हे बहारिनमध्ये नोकरी करणाऱ्या अभिजीत इगावे यांनी आपल्या छोट्याश्या पण भल्या मोठ्या कृतीतून दाखवून दिलंय. कारण, समाजानं वेडा ठरवलेल्या माणसांतला शहाणेपणा त्यांनी काही तासांतच जगासमोर आणलाय.

कोई भी आदमी पैदाईशी गुन्हेगार नही होता, हालात उसे मजबूर कर देते है, हा डायलॉग आपण अनेक चित्रपटांत पाहिला, ऐकला असेल. अगदी तसेच, अनेकांची परिस्थिती त्यांना वेड्यासारखं जीवन जगायला भाग पाडते. साताऱ्यातील यवतेश्वराच्या डोंगरपायथ्याजवळ असाच एक राजामाणूस वेड्यासारखं जीवन जगत होता, लोकांपासून दूरदूर पळत होता. आपल्याच धुंदीत राहात होता. मात्र, केवळ वेगळ्या दृष्टीकोनातून, आपुलकीतून अभिजीत यांनी वेडा नसेलल्या या वेड्याकडे पाहिलं अन् त्यातील राजेंद्र ढाणेंचा पुनर्जन्म झाला.  

साताऱ्यामध्ये यवतेश्वरच्या डोंगरावरून खाली उतरत असताना पेढ्याचा भैरोबा मंदिराजवळ एक व्यक्ती मंदिराच्या बाहेर बसला होता, काही छोटी मुले त्याला घाबरत होती. जवळपास, एक वर्षांपासून त्याच्या अंगावर तेच कपडे असावेत, डोक्यावरचे केस हे वर्षांपासून धुतलेले नसावेत, आंघोळ तर विसरूनच जावा अशी त्याची अवस्था होती. तुम्ही त्याच्याजवळ गेलात तर दूर पळून जाण्यासाठी वासच खूप झाला. एकंदरीत त्याचा अवतार हा लहान मुलांनाच नाही, तर मोठ्यांनाही भीती दाखवेल असाच होता. मात्र, अभिजीत यांनी जवळ जाऊन आपुलकीनं संवाद साधला अन् काही तासांतच बदलाला सुरुवात झाली.  

अभिजीत यांचे सासरे तीन दिवसांपासून या व्यक्तीला केशकर्तनायलात घेऊन जायचा प्रयत्न करत होते,पण तो राजी होत नव्हता. मात्र, अभिजीत यांनी त्या व्यक्तीच्या शेजारी त्यांच्या मुलासह आणखी एका व्यक्तीला बसवून फोटो काढला. हा फोटो त्या वेड्या वाटणाऱ्या माणसाला दाखवला. त्यानंतर, स्वत:चाही फोटो त्याच्यासोबत काढून हे सर्व फोटो त्याला दाखवले. कदाचित आपला फोटो पाहून त्याचेही मन कचरले, आपण असे तर नव्हतो ना.... याची जाणीव त्याच्या संवेदनशील मनाने घेतली असावी. यापूर्वी कधी स्वत:ला फोटोत पाहिलं होतं, हेच त्याला आठवलं असेल. म्हणूनच, त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव क्षणार्धात बदलले. अभिजीत यांच्या विनंतीला मान देऊन तो केश कर्तनालयात आला. पण, त्याचा अवतार पाहून केशकर्तनालयवाला केस व दाढी करायला तयार नव्हता. विनंती करुन, थोड्याफार गप्पा गोष्टी करुन अखेर तो तयार झाला. काही तासांपूर्वी वेडा वाटणारा व्यक्ती, आता राजेंद्र ढाणे या नव्या अवतारात वावरण्यासाठी सज्ज झाला होता. राजेंद्रच्या केसांवर कात्रीचे वार सपासपा होऊ लागले, पाच मिनिटांतच वेड्यांच्या विश्वातून तो माणसांच्या जगामध्ये आला.

अभिजीत यांनी राजेंद्र यांचे केस कापल्यानंतर त्याला घरी नेऊन आंघोळही घातली, कदाचित त्याच्यासाठी दिवाळीच्या अभ्यंगस्नानाचीच अंघोळ असावी ती. त्यानंतर, दोन पॅन्ट व दोन शर्ट देऊन, जेऊ घालून राजेंद्रला मुक्त केले. राजेंद्रचा वेड्यातून शहाण्याकडे झालेला हा काही तासांचा प्रवास मनाला अत्यानंद आणि समाधान देऊन गेल्याचं अभिजीत यांनी म्हटलंय. आज राजेंद्र ढाणे भैरोबाच्या डोंगरावर गुलाबी शर्ट व निळ्या रंगाच्या जीन्समध्ये तुम्हाला एखाद्या निसर्गाच्या राखणदाराप्रमाणे वेगळ्याच थाटात वावरताना दिसेल. येणारा जाणाऱ्या व्यक्तींनी डोंगराबद्दलची माहिती त्याला विचारली तर नवल वाटू देऊ नका. कारण, तो तेथील नेचर गाईड बनलाय. माणूसकी केवळ बोलण्यापेक्षा आचरणात आणल्यास समाधानच नाही, तर वेगळाच आत्मविश्वास देऊन जाते एवढे मात्र नक्की.

अभिजीत इगावे बहारिन येथे नोकरीला असतात. मात्र, सध्या कोविडमुळे मायदेशी परतल्यानंतर गेल्या महिन्यात ते सातारा दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी, दूरदेशी असलेल्या नागरिकांच्या मनातही मायदेशातील माणसांच्या आपलुकीचा झरा कसा वाहतो, हे पाहायला मिळालं. एखाद्याला केलेली मदत अन् त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर उललेलं हास्य, हे तुम्हाला महिन्याला मिळणाऱ्या पगारापेक्षा मोठा आनंद देऊन जाते हेच अभिजीत यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलंय.  

टॅग्स :सातारा परिसरमुंबईफेसबुक