Join us

अबू आझमींच्या विधानावरून विधिमंडळात प्रचंड गदारोळ; दिवसभरासाठी दोन्ही सभागृह तहकूब

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 05:47 IST

अबू आझमींना निलंबित करणार का, याबाबत आता उत्सुकता आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाची प्रशंसा केल्याच्या मुद्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंगळवारी प्रचंड गदारोळ झाला, सत्तापक्षाच्या आमदारांनी गोंधळ घालत कामकाज वारंवार बंद पाडले. शेवटी कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. आता बुधवारी आझमींना निलंबित करणार का, याबाबत उत्सुकता आहे. 

 विधानसभेत सभागृहाचे कामकाज तीन वेळा आणि नंतर दिवसभरासाठी, तर विधान परिषदेत दोनवेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात येत असल्याचे अनुक्रमे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि सभापती राम शिंदे यांनी जाहीर केले. विधानसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपचे महेश लांडगे, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री उदय सामंत, अतुल भातखळकर, योगेश सागर यांनी अबू आझमींवर हल्लाबोल केला. 

घोषणांनी सभागृह दणाणले

भाजप-शिंदेसेनेचे आमदार वेलमध्ये उतरले आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’, अशा घोषणांनी त्यांनी सभागृह दणाणून सोडले. औरंगजेबाची महाराष्ट्रातील कबर उद्ध्वस्त केली पाहिजे, अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली. उद्धव सेनेचे आमदारही शेवटी आक्रमक झाले आणि त्यांनीही घोषणाबाजी केली, त्यांच्यापैकी कोणाला बोलण्याची संधी मिळण्याआधीच कामकाज  दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. 

विधान परिषदेत पडसाद

विधान परिषदेतही विरोधक आणि सत्ताधारी सदस्यांनी गदारोळ करून कामकाज रोखून धरले. सभापतींसमोरील मोकळ्या जागेत धाव घेत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जयजयकार करत त्यांनी अबू आझमींविरोधात घोषणा दिल्या. सभागृह नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अबू आझमींचा धिक्कार करून त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले. आझमींना बडतर्फ करण्याची मागणीही त्यांनी केली. 

सभापती प्रा. राम शिंदे यांनी राज्यात महापुरुषांचा अपमान सहन केला जाणार नाही. आझमी यांच्यावर तीव्र कारवाई करावी, तसेच छत्रपती  शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल ज्यांनी-ज्यांनी काही आक्षेपार्ह  विधाने केली असतील, त्यांच्यावर शासनाने कारवाई करावी, असे निर्देश दिले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आझमींबरोबरच इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारे प्रशांत कोरटकर आणि अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी केली. 

माझ्या वक्तव्याची मोडतोड करून सोयीस्कर अर्थ काढला गेला. कुणाला वाटत असेल की माझ्या वक्तव्याने भावना दुखावल्या आहेत तर मी माझे वक्तव्य मागे घेतो. विधिमंडळाचे कामकाज सुरु राहायला पाहिजे. - अबू आझमी.

 

 

टॅग्स :विधान भवनअबू आझमीमहायुती