कॉमर्स शाखेचा ‘कट ऑफ’ यंदाही वाढणार; पदवी प्रवेशासाठी चुरस; ४,५२४ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 07:23 IST2025-05-06T07:23:43+5:302025-05-06T07:23:51+5:30
मुंबई मंडळातून यंदा दोन लाख ९१ हजार ९५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात वाणिज्य शाखेतून उतीर्ण झालेले एक लाख ५२ हजार ८६२ विद्यार्थी आहेत.

कॉमर्स शाखेचा ‘कट ऑफ’ यंदाही वाढणार; पदवी प्रवेशासाठी चुरस; ४,५२४ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बारावीच्या परीक्षेत यंदा मुंबईत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्यावर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढली आहे. त्यामुळे यंदाही पदवीच्या प्रथम वर्षाकरिता नामांकित कॉलेजांमध्ये प्रवेशासाठी चुरस निर्माण होण्याची चिन्हे आहे. त्यामध्ये कॉमर्स शाखेचा ‘कट ऑफ’ यंदाही अधिक राहणार आहे. सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमांना स्पर्धा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मुंबई मंडळातून यंदा दोन लाख ९१ हजार ९५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात वाणिज्य शाखेतून उतीर्ण झालेले एक लाख ५२ हजार ८६२ विद्यार्थी आहेत. मुंबई विद्यापीठात पदवीच्या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी यंदाही तीन लाखांहून अधिक जागा असल्या तरी नामांकित कॉलेजांमधील वाणिज्य आणि कला शाखांना विद्यार्थ्यांचा अधिक ओढा राहील.
त्यातच राज्याच्या अन्य भागांतील विद्यार्थ्यांचाही मुंबईत शिक्षणासाठी येण्याकडे अधिक कल असतो. अन्य बोर्डांचे विद्यार्थीही प्रवेशाच्या रांगेत आल्याने वाणिज्य शाखेसाठी नामांकित कॉलेजांमध्ये स्पर्धा अधिक असेल, असे चित्र दिसत आहे. यंदा मुंबई विभागात ४,५२४ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. तर २६,०९८ विद्यार्थ्यांना ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. याचाही परिणाम प्रवेशाच्या कट ऑफवर होईल.
या कॉलेजमध्ये प्रवेशासाठी धडपड
वाणिज्य शाखेसाठी प्रसिद्ध असलेल्या पोदार कॉलेज, एमसीसी कॉलेज, डहाणूकर कॉलेज, एचआर कॉलेज आदी कॉलेजांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच रामनारायण रुईया कॉलेज, रुपारेल कॉलेज, साठये कॉलेज, वझे-केळकर कॉलेज, सोमय्या कॉलेज, सेंट झेवियर्स कॉलेज, एसआयईएस सायन कॉलेज आदींमध्येही प्रवेशासाठी चुरस असेल, असे प्राध्यापकांनी सांगितले.
पोदार कॉलेजमध्ये यंदा २८८ विद्यार्थ्यांना
९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. गेल्यावर्षी आमच्या कॉलेजचा खुल्या प्रवर्गाचा ‘कट ऑफ’ ९४ टक्के एवढा होता. यंदा ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने हा ‘कट ऑफ’ आणखी वाढू शकेल.
विनिता पिंपळे, प्राचार्या,
पोदार महाविद्यालय
विद्यार्थ्यांचा वाणिज्य शाखेतील सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमांकडे अधिक ओढा असतो. त्यामध्येही यंदा फायनान्स आणि टेक्नॉलॉजीतील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अधिक स्पर्धा राहण्याची शक्यता आहे. त्यातून नामांकित कॉलेजांमध्ये प्रवेशाचा कट ऑफ वाढू शकतो.
पराग आजगावकर,
प्राचार्य, एन. एम. कॉलेज
या अभ्यासक्रमांना अधिक पसंती
पदवीसाठी वाणिज्य शाखेच्या बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, बॅचलर ऑफ अकाउंट अँड फायनान्स, बॅचलर ऑफ बँकिंग अँड इन्शुरन्स आदी व्यावसायिक अभ्याक्रमांकडे विद्यार्थ्यांचा ओढा अधिक असतो. कला शाखेतील मानसशास्त्र, अर्थशास्त्र, परदेशी भाषा, बीएमएम अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची पसंती असते.
श्रेणीनिहाय निकाल
श्रेणी उत्तीर्ण विद्यार्थी
९० टक्के व त्याहून अधिक ४,५२४
८५ ते ९० टक्के ८,८३२
७५ ते ८५ मधील २९,४५०
६० ते ७५ मधील ८४,६३२
४५ ते ६० मधील १,२६,५३९
३५ ते ४५ मधील ३८,३०३