Join us

विमानात वैमानिकांना ताण किती? थकवा, ठोके मोजणारे आले गॅझेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 13:16 IST

Airplane: वाढत्या तणावामुळे अलीकडेच तीन वैमानिकांचा मृत्यू झाल्यानंतर आणि त्यानंतर वैमानिकांमधील थकवा व ताणाचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर आता इंडिगो कंपनी लवकरच एका अभिनव प्रयोगाद्वारे वैमानिकांचा थकवा मोजणार आहे.

मुंबई - वाढत्या तणावामुळे अलीकडेच तीन वैमानिकांचा मृत्यू झाल्यानंतर आणि त्यानंतर वैमानिकांमधील थकवा व ताणाचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर आता इंडिगो कंपनी लवकरच एका अभिनव प्रयोगाद्वारे वैमानिकांचा थकवा मोजणार आहे. फ्रान्स येथील एका संशोधन कंपनीने सहा वर्षांच्या संशोधनानंतर एक गॅजेट तयार केले असून त्याद्वारे थकवा, ताण मोजला जाणार आहे. एकदा का ही माहिती कंपनीला प्राप्त झाली की, त्यानुसार वैमानिकांच्या ड्यूटीचे वेळापत्रक निश्चित करणे कंपनीला सुलभ होणार आहे. 

उपलब्ध माहितीनुसार, वैमानिकांच्या मनगटाला घडाळ्याप्रमाणे असलेले हे गॅजेट बांधले जाईल. वैमानिक उड्डाणापूर्वी किती अलर्ट आहे, प्रवासादरम्यान त्याची स्पंदने नियमित आहेत का, विमान उतरविताना त्याला किती ताण आहे, तसेच त्याला किती थकवा आला आहे, या सर्वांची माहिती या गॅजेटच्या माध्यमातून नोंदवली जाणार आहे. 

येत्या काही महिन्यांत या वैमानिकांच्या हातात हे गॅजेट बांधून ही सर्व माहिती संकलित करून त्याचे पृथःकरण करण्यात येईल. त्यानंतर वैमानिकांच्या वेळा, त्यांच्यावर येणारा ताण व त्या अनुषंगाने त्यांच्या कामाच्या वेळा निश्चित केल्या जातील. 

वैमानिकांच्या मृत्यूच्या घटना कंपनीच्या ताफ्यात असलेल्या विमानांच्या माध्यमातून कंपनी सध्या दिवसाकाठी १९०० फेऱ्या करते, तर याकरिता कंपनीकडे एकूण चार हजार वैमानिक आहेत. १७ ऑगस्ट रोजी नागपूर येथून विमान घेऊन येण्यासाठी सज्ज होणाऱ्या कंपनीच्या वैमानिकाचा विमानाच्या दारातच तणावामुळे मृत्यू झाला होता. तर, त्याच दरम्यान अन्य दोन विमान कंपन्यांच्याही दोन वैमानिकांच्या मृत्यूच्या घटनांची नोंद झाली होती. त्यानंतर वैमानिकांच्या तणावाचा तसेच थकव्याचा मुद्दा ऐरणीवर आला होता.

टॅग्स :इंडिगोविमान