महामुंबईत रोज किती पेट्रोल-डिझेल-गॅस-सीएनजी लागते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 13:32 IST2026-03-15T13:32:04+5:302026-03-15T13:32:39+5:30
२,५०० टँकरद्वारे ७५ लाख लिटर पेट्रोल, १.४० कोटी लिटर डिझेलचे १,२०० पंपाद्वारे वितरण; तर ४,२०० टन एलपीजीचा हाेतो पुरवठा

महामुंबईत रोज किती पेट्रोल-डिझेल-गॅस-सीएनजी लागते?
नारायण जाधव -
नवी मुंबई : महामुंबईत दररोज कोट्यवधी लिटर इंधनाची गरज भागवण्यासाठी हजारो टँकर शहरात दाखल होत असतात. पेट्रोल, डिझेल, एलपीजी आणि विमान इंधनाचा पुरवठा मुख्यत्वे मुंबईतील तेल डेपो आणि रिफायनरी परिसरातून केला जातो. ऊर्जा क्षेत्रातील अंदाजानुसार, महामुंबईच्या गरजा भागवण्यासाठी दररोज सुमारे २००० ते २५०० इंधन टँकर विविध डेपोंमधून शहर व उपनगरांतील १२०० पेक्षा जास्त पेट्रोल पंप आणि ३५० हून अधिक सीएनजी स्टेशनवर पाठवले जाते, अशी माहिती या क्षेत्रातील सूत्रांनी दिली.
आखाती युद्धामुळे देशभरात निर्माण झालेल्या गॅससह इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर महामुंबईतील महानगरांतील शहरांना दररोज किती इंधन, घरगुती गॅस व रस्ते बांधकामासाठी डांबर लागते, याची माहिती ‘लोकमत’ने जाणून घेतली.
महामुंबईतील प्रमुख तेल डेपो व टर्मिनल्स
वडाळा ऑइल टर्मिनल - हे देशातील सर्वात मोठ्या पेट्रोलियम स्टोरेज टर्मिनलपैकी एक असून पेट्रोल, डिझेल, एटीएफ साठवण व मुंबई व उपनगरांसाठी प्रमुख वितरण केंद्र आहे.
माहुल टर्मिनल - मोठे पेट्रोलियम व केमिकल स्टोरेज हब असून पाइपलाइनद्वारे रिफायनरीशी जोडलेले
बीपीसीएल मुंबई रिफायनरी - भारतातील महत्त्वाची रिफायनरी
असून रोज लाखो लिटर पेट्रोल-डिझेल उत्पादन होते.
एचपीसीएल मुंबई रिफायनरी - मोठ्या प्रमाणावर पेट्रोल, डिझेल, एटीएफ उत्पादन होते. येथून पश्चिम भारतासाठी पुरवठा होतो.
जेएनपीटी लिक्विड कार्गो टर्मिनल- आयात होणाऱ्या पेट्रोलियम उत्पादनांसाठी प्रमुख बंदर टर्मिनल
मुंबई बंदर तेल टर्मिनल - क्रूड
ऑइल आणि पेट्रोलियम उत्पादने उतरवण्याचे केंद्र
ट्रॉम्बे ऑइल टर्मिनल - पाइपलाइन व टँकरद्वारे वितरण
उरण एलपीजी टर्मिनल - येथूनच मोठ्या प्रमाणावर एलपीजीची साठवण व वितरण होते.
पनवेल पेट्रोलियम डेपो- येथून नवी मुंबई व रायगडसाठी वितरण होते.
भिवंडी पेट्रोलियम स्टोरेज हब - भिवंडी परिसरात मोठ्या संख्येने असलेल्या लॉजिस्टिक्स हबसाठी डिझेल-पेट्रोल वितरण होते.
