२९ हजार की ५०... बोनस किती? पालिकेचा निर्णय पुढील आठवड्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 10:13 IST2025-10-10T10:13:33+5:302025-10-10T10:13:48+5:30
गेल्या वर्षी २९ हजार रुपये बोनस दिला होता. यंदा त्यात मोठी वाढ करणे गरजेचे आहे, असे मत फेडरेशनने आयुक्तांकडे मांडले.

२९ हजार की ५०... बोनस किती? पालिकेचा निर्णय पुढील आठवड्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महापालिका कर्मचाऱ्यांच्या दिवाळी सानुग्रह अनुदानाचा (बोनस) निर्णय पुढील आठवड्यात होणार आहे. मुंबई कामगार कर्मचारी संघटना फेडरेशनने आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे बोनसबाबत निर्णय घेण्याची विनंती केली आहे. बोनसबाबत गगराणी यांनी पुढील आठवड्यात चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे, असे फेडरेशनच्या वतीने सांगण्यात आले.
फेडरेशनने २०२४-२०२५ या वर्षासाठी कर्मचाऱ्यांना ५० हजार रुपये बोनस देण्याची मागणी केली आहे. गेल्या वर्षी २९ हजार रुपये बोनस दिला होता. यंदा त्यात मोठी वाढ करणे गरजेचे आहे, असे मत फेडरेशनने आयुक्तांकडे मांडले. दिवाळी सुरू होण्यापूर्वी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात बोनस जमा व्हावा, यासाठी फेडरेशनने ४ दिवसांत चर्चा करून निर्णय घेण्याची विनंती आयुक्तांना केली आहे.
मुंबई कामगार कर्मचारी संघटनेने ५० हजार रुपये बोनस देण्याची मागणी केली आहे.
एक लाख कर्मचाऱ्यांची उत्सुकता शिगेला
पुढील आठवड्यातील चर्चेकडे सुमारे एक लाख कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. गुरुवारच्या बैठकीसाठी फेडरेशनचे निमंत्रक प्रकाश देवदास आणि बाबा कदम यांच्यासह नवनाथ महानगर, अशोक जाधव, राजेंद्र मोहिते, दिवाकर दळवी, यशवंत धुरींसह २२ संघटनांचे नेते उपस्थित होते.