Join us
Daily Top 2Weekly Top 5

१७ दिवसात किती लोकांनी घेतला शिवभोजन थाळीचा आस्वाद?; राज्य सरकारनं दिली आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 16:31 IST

या थाळीची किंमत शहरी भागात ५० आणि ग्रामीण भागात ३५ रुपये इतकी आहे. परंतू लाभार्थ्याला फक्त १० रुपये देऊन जेवणाचा अस्वाद घेता येतो.

ठळक मुद्देया थाळीची किंमत शहरी भागात ५० आणि ग्रामीण भागात ३५ रुपये इतकी आहे.थाळींची संख्या आता १४६३९ वर पोहोचली आहे.योजनेत राज्यात १३९ शिवभोजन केंद्रे सुरु झाली

‍मुंबई - गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध व्हावे यासाठी प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून राज्यात  शिवभोजन  योजनेची अंमलबजावणी सुरु झाली. ११ फेब्रुवारी २०२० रोजी योजनेच्या अंमलबजावणीला १७ दिवस पुर्ण झाले. या १७ दिवसांच्या काळात राज्यात २ लाख ३३ हजार ७३८ नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला असल्याचे दिसून आले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कल्पनेतून साकार झालेल्या “शिवभोजन योजने”ला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे. पहिल्या आठ दिवसांच्या कालावधीतच म्हणजे २ फेब्रुवारी २०२० पर्यंतच शिवभोजन थाळीचा लाभ घेणाऱ्यांची संख्या १ लाखांहून अधिक (१ लाख ५ हजार ८८७)  झाली होती. आता ११ फेब्रुवारीपर्यंत त्यात आणखी एक लाखांहून अधिक लाभार्थ्यांची वाढ झाली आहे.

योजनेच्या अंमलबजावणीवर मुख्यमंत्र्यांचा वॉच शिवभोजन योजनेत जेवण देतांना स्वच्छता, टापटीप आणि जेवणाचा दर्जा उत्तम राहावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: या योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवून आहेत. शिवभोजन केंद्रातून नागरिकांना चांगले आणि सकस जेवण मिळावे यासाठी ते आग्रही आहेत. याच उद्देशाने त्यांनी काही दिवसांपूर्वी योजना सुरु झाल्यानंतर शिवभोजन केंद्रात जेवण घेत असलेल्या नागरिकांशी व्हिडिओ कॉन्फरंसिगच्या माध्यमातून त्यांनी थेट संवाद साधला होता. जेवणाबाबत समाधानी आहात का? जेवणाची चव व्यवस्थित आहे का? काही सूचना असल्यास मनमोकळेपणाने सांगण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले होते. 

जिल्हा रुग्णालये, बस तसेच रेल्वे स्थानक परिसर, शासकीय कार्यालये, इ. ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरु करण्यात आली आहेत त्यामुळे गरीब आणि गरजू लोकांना, मजूरांना याचा लाभ घेणे शक्य झाले आहे. दरदिवशीच्या थाळींच्या संख्येत वाढ होतांना दिसत असून पहिल्या दिवशीची ११३०० थाळींची संख्या आता १४६३९ वर पोहोचली आहे.

लाभार्थ्यांना फक्त १० रुपयात थाळीया थाळीची किंमत शहरी भागात ५० आणि ग्रामीण भागात ३५ रुपये इतकी आहे. परंतू लाभार्थ्याला फक्त १० रुपये देऊन जेवणाचा अस्वाद घेता येतो. उर्वरित फरकाची रक्कम अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून अनुदान स्वरूपात संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना आणि मुंबई आणि ठाण्यासाठी नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांना देण्याची तरतूद योजनेत आहे. योजनेत राज्यात १३९ शिवभोजन केंद्रे सुरु झाली आहेत. 

टॅग्स :शिवभोजनालयउद्धव ठाकरेशिवसेनाराज्य सरकार