सैफचा इन्शुरन्स क्लेम लगेच कसा पास होतो?; तज्ज्ञ डॉक्टरांच्या संघटनेकडून चौकशीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 05:47 IST2025-01-28T05:46:58+5:302025-01-28T05:47:14+5:30
सामान्यांना विम्याचा दावा मंजूर करून घेताना चकरा माराव्या लागतात.

सैफचा इन्शुरन्स क्लेम लगेच कसा पास होतो?; तज्ज्ञ डॉक्टरांच्या संघटनेकडून चौकशीची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : चोराच्या हल्ल्यात जखमी झालेला अभिनेता सैफ अली खान याच्यावर लिलावती रुग्णालयात उपचारांसाठी झालेला २५ लाख रुपयांचा खर्च विमा कंपनीने तत्काळ मंजूर केला. मात्र, सामान्यांना विम्याचा दावा मंजूर करून घेताना चकरा माराव्या लागतात. केवळ वलयांकित व्यक्ती आणि पंचतारांकित रुग्णालय असल्याने सैफला विशेष वागणूक मिळाली, याची चौकशी करण्याची मागणी असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट या तज्ज्ञ डॉक्टरांच्या संघटनेने विमा नियामक प्राधिकरणाकडे केली आहे.
संघटनेने इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंन्ट अथॉरिटी ऑफ इंडिया (आयआरडीए) विमा नियामक प्राधिकरण यांना लिहिलेल्या पत्रात कॅशलेस क्लेम, सेलिब्रिटीज यांना देण्यात येणारी विशेष वागणूक, तसेच सर्वसामान्य नागरिक आणि लहान नर्सिंग होम यांना इन्शुरन्स क्लेम देताना केली जाणारी वागणूक, यावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट या संघटनेचे १४ हजार सदस्य आहेत.
विशेष वागणूक देऊ नये...
संघटनेने पत्रात काही मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी, या प्रकरणाची चौकशी करावी आणि व्यक्तीचे समाजातील स्थान विचारत न घेता सर्व विमाधारकांना सारखीच वागणूक द्यावी.
अशी विशेष वागणूक दिली जाऊ नये, यासाठी कठोर नियम बनवावेत. कॅशलेस उपचार घेताना सर्वसामान्य विमाधारकांचा विश्वास राहील, अशा पद्धतीची पारदर्शकता असावी.
आम्ही कोणत्या हॉस्पिटलला किंवा कोणत्या व्यक्तीचा किती विमा दावा मान्य केला याविरोधात नाही, तर सर्वसामान्य विमानधारकांना आणि नर्सिंग होमला समान न्याय दिला पाहिजे, असा आमचा आग्रह आहे. केवळ नर्सिंग होममध्ये उपचार घेत आहे, म्हणून कॅशलेस क्लेम नाकारायचा हे धोरण चुकीचे आहे. कोणत्याही विमाधारकाला आणि कॉर्पोरेट रुग्णालयाला विशेष वागणूक देऊ नये, असे संघटनेचे मत आहे.
डॉ. सुधीर नाईक,
चेअरमन, मेडिको लीगल असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट