दाऊद दरवेळी वाचतो कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2023 10:31 AM2023-12-24T10:31:12+5:302023-12-24T10:32:36+5:30

पाकिस्तानात लपून बसलेल्या दाऊद इब्राहिमचा विषप्रयोगाने मृत्यू झाल्याची अफवा नुकतीच देशभर पसरत नागपाड्याच्या मोहल्ल्यात शिरली.

how does dawood safe every time | दाऊद दरवेळी वाचतो कसा?

दाऊद दरवेळी वाचतो कसा?

रवींद्र राऊळ, मुक्त पत्रकार

१९९३ च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट मालिकेनंतर वर्षभराने दाऊदने ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी यांच्यामार्फत शरणागती पत्करण्याचे प्रयत्न केले होते. मात्र, त्यासाठी त्याने घातलेल्या अटी मान्य नसल्याने तत्कालीन सरकारने त्याला नकार दिला होता. 

पाकिस्तानात लपून बसलेल्या दाऊद इब्राहिमचा विषप्रयोगाने मृत्यू झाल्याची अफवा नुकतीच देशभर पसरत नागपाड्याच्या मोहल्ल्यात शिरली. दाऊदचा साथीदार छोटा शकील याने दाऊद सुखरूप असल्याचे स्पष्टीकरण दिल्याने ही वावटळ शमली असली तरी आता या अफवेमागील तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या अफवेनंतर पसरलेल्या वातावरणामुळे तीन दशकांपूर्वी मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवून दाऊदने माजवलेला उत्पात मुंबईकरांच्या किती जिव्हारी लागलेला आहे, हेही दिसून आले. 

मुंबईत जन्मलेल्या दाऊदच्या मृत्यूच्या जोरदार चर्चेमुळे पाकिस्तान सरकारला पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुरक्षाव्यवस्था वाढवावी लागते आणि इंटरनेटचे जाळेही बंद पाडावे लागले, यावरून दाऊदबाबत पाक किती सावधगिरी बाळगते ते दिसून येते. त्याला आश्रय दिल्याचे सातत्याने नाकारणाऱ्या पाकचा पर्दाफाश करणे अद्याप भारताला जमू शकलेले नाही.

आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या मृत्यूची अफवा पसरण्याची ही चौथी घटना. २०१६ मध्ये गँगरीन होऊन पाय कापावा लागल्याने, तर २०१७ मध्ये ब्रेन ट्यूमरने दाऊदचा मृत्यू झाल्याच्या बातम्या पसरल्या. कोरोना साथीतही अशीच अफवा पसरली होती. पण, दाऊद नव्हे तर त्याचा पुतण्या सिराज कासकरचे निधन झाल्याचे नंतर उघडकीस आले होते. 

दाऊदची ही अफवा त्यानेच पसरवली का, याचाही अदमास तपास यंत्रणा घेत आहेत. गेल्या दोन वर्षांत भारतात घातपात घडवणाऱ्या दहशतवाद्यांमध्ये हलकल्लोळ माजला आहे. या काळात पाकिस्तानात १६ बडे दहशतवादी वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये अज्ञात मारेकऱ्यांकडून मारले गेले. त्यांच्या हत्येची जबाबदारी अद्याप कुणी स्वीकारलेली नाही. कॅनडात राहून खलिस्तानवादी चळवळीला खतपाणी घालणाऱ्या हरदीपसिंग निज्जर याची अशाच प्रकारे हत्या झाली, तर गुरपत सिंग पांनू याच्या हत्येचा प्रयत्न झाला. लष्कर-ए-तोयबाचा सदस्य साजिद मीर याचीही विष देऊन हत्या करण्यात आली. मुंबईवरील हल्ल्यात त्याचा सहभाग होता. या घटनांमुळे भारतात अतिरेकी कारवाया घडवणाऱ्या दहशतवाद्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. 

पाकिस्तानमधील इतरांना आलेल्या मृत्यूची दाऊदलाही भीती वाटतेय का आणि त्याचमुळे सुरक्षा वाढवावी यासाठी त्यानेच विष प्रयाेगाची अफवा पसरवली का, असा प्रश्न गुप्तचर यंत्रणांना पडला आहे. अमेरिकेत ट्विन टॉवरवर विमानहल्ला घडवणाऱ्या अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन याला अमेरिकेने याच पाकिस्तानात शोधून यमसदनी  पाठवले होते. पण, भारत ३० वर्षांत दाऊदच्या केसाला धक्का लावू शकलेला नाही, याचे वैषम्य इथल्या जनतेला वाटत आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे तिथे राहून तो आपल्या कारवाया पार पाडतो आहे. उद्योगातील वाद मिटवण्यासाठी गुटखा किंग असलेले उद्योजक कराचीतील दाऊदच्या दरबारात पोहोचू शकतात, हे वास्तव बरेच काही सांगून जाते. म्हणूनच दाऊदची ही बातमी आली तेव्हा काहींची तगमग वाढली, काही जण कासाविस झाले, तर काहींनी सुटकेचा निःश्वास सोडला.

२०१३ मधील ‘रॉ’चा तो कट

दाऊदच्या शोधासाठी भारतीय गुप्तचर यंत्रणांनी केलेले आतापर्यंतचे अनेक प्रयत्न अपयशीच ठरले. २०१३ साली रॉने रचलेला कट हा त्यातला एक. त्यासाठी मोसादनेही रॉ या गुप्तहेर संघटनेला मदत करण्याची तयारी दर्शवली होती. ‘रॉ’ने दाऊदच्या हत्येसाठी नऊ एजंटांची टीम तयार केली. त्यांना सुपर बॉय हे कोड नेम देण्यात आले होते. 

त्यांना सुदान, बांगलादेश आणि नेपाळचे पासपोर्ट देऊन कराचीत पाठवण्यात आले. तेथे क्लिफ्टन रोडवर राहणारा दाऊद दररोज डिफेन्स हाउसिंग कॉलनीत जायचा. हे सुपर बॉय या मार्गावरील एका दर्ग्याबाहेर दबा धरून बसले होते. मात्र, शेवटच्या क्षणी या टीमला शंका निर्माण करणारा एक फोन कॉल आला आणि पूर्ण ऑपरेशन रद्द करण्यात आले. 

तो कॉल नेमका कोणाचा होता याची चर्चा गेल्या दहा वर्षांपासून गुप्तचर अधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे. दुबईतील दाऊदच्या मुलीच्या लग्न सोहळ्यावेळीही अशीच योजना छोटा राजन टोळीच्या मदतीने रचण्यात आली होती. पण, या योजनेतील गुंडांना मोहिमेवर जाण्यापूर्वीच मुंबई पोलिसांनी अटक केली आणि योजना बारगळली. त्यामुळे दाऊदबाबत भारत सरकारला नशीब कधी साथ देतेय, असाच सवाल केला जात आहे.

 

Web Title: how does dawood safe every time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.