Join us  

महाराष्ट्र बजेट 2019: सभागृहात मांडण्याआधी अर्थसंकल्प फुटलाच कसा ?- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 4:12 PM

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पावरून सत्ताधारी सेना-भाजपाला धारेवर धरलं आहे.

मुंबई- राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पावरून सत्ताधारी सेना-भाजपाला धारेवर धरलं आहे. आजपर्यंत कधीही अर्थसंकल्प फुटलेला नव्हता. अर्थसंकल्प सभागृहात मांडण्याआधीच फुटला, मुनगंटीवर सभागृहात अर्थसंकल्प मांडत असतानाच ट्विटर अर्थसंकल्पाच्या पोस्ट पडत होत्या. इकडे अर्थसंकल्प मांडत आहेत, मग ट्विटरवर कशा काय पोस्ट पडत होत्या, असा प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला आहे. 

दुसरीकडे विधानसभेत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार अर्थसंकल्प मांडत असताना, त्या आधीच त्यांच्या ट्विटर अकाऊंटर अर्थसंकल्पाचे मुद्दे तयार करून  ग्राफीक्सच्या माध्यमातून प्रसिद्‌ध झाल्याने विधान परिषदेत गोंधळ उडाला होता. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यावर आक्षेप घेतल्यानंतर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. अर्थमंत्र्यांच्या ट्विटरवरून अर्थ संकल्प फुटला असल्याचा आरोपसुद्धा विरोधकांनी केला.

सुधीर मुनगंटीवार अर्थसंकल्प मांडत असताना त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर अर्थसंकल्पातील मुद्दे टाकले जात आहेत, असेही धनंजय मुंडे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनतर, अर्थमंत्र्यांच्या ट्विटरवरून अर्थ संकल्प फुटल्याचा आरोप करत विरोधकांनी अर्थसंकल्प वाचनावेळी प्रचंड गोंधळ घातला. विधान परिषदेत 10 मिनिटांसाठी कामकाज थांबून परत सुरू करण्यात आले. तर हा केवळ तांत्रिक मुद्दा असल्याचे सांगत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प मांडणे सुरू ठेवले आहे.

टॅग्स :अजित पवारमहाराष्ट्र बजेट 2019