एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या ब्रिजवरचा अपघात नेमका झाला कसा ? वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 14:06 IST2017-09-29T14:02:51+5:302017-09-29T14:06:08+5:30
मुंबईतील एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरी झाली आणि या दुर्घटनेत 22 जणांनी प्राण गमावले असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. एकूण 33 जण जखमी झाले आहेत.

एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या ब्रिजवरचा अपघात नेमका झाला कसा ? वाचा सविस्तर
मुंबई - मुंबईतील एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरी झाली आणि या दुर्घटनेत 22 जणांनी प्राण गमावले असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. एकूण 33 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेबद्दल अनेक कयास बांधले. काही जणांनी सुरुवातीला म्हटलं की शॉर्ट सर्कीट झाल्याने धावपळ झाली आणि त्यामुळे चेंगराचेंगरी झाली मात्र खरं कारण हे वेगळं आहे.
सकाळपासूनच मुंबई शहरात कोसळणाऱ्या पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावला होता. यावेळी परेल आणि एलफिन्स्टन रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या पुलावर प्रचंड गर्दी झाली होती. यादरम्यान पुलावरील पत्र्याचा काही भाग खाली कोसळल्याचे वृत्त समोर आले. मात्र पूल सुरक्षित होता. पण या घटनेदरम्यान प्रवाशांमध्ये पूल पडल्याची अफवा पसरल्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आणि याचे रूपांतर चेंगराचेंगरीत झाले. नेमका याचसुमारास जोरदार पाऊस पडला आणि अनेक प्रवासी बाहेर न जाता खोळंबले होते. त्यात नवीन येणारी प्रत्येक गाडी हजारो प्रवासी या दोन्ही स्टेशनांवर येत होते.
त्यामुळे थोड्याच वेळात या स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली. त्यात झालेल्या लहान घटनेमध्ये पूल पडल्याच्या अफवेची भर पडली. काही जणांनी शॉर्ट सर्किट झाल्याची बोंब ठोकली. या सगळ्याचा विपरीत परिणाम होत प्रवाशांमध्ये घबराट पसरली आणि चेंगराचेंगरीची तीव्रता वाढली. ब्रिजबाहेर निघण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नसल्याने ब्रिजच्या बाजूला लावलेले पत्रे फोडून लोकांना बाहेर काढावं लागलं.
मात्र तोपर्यंत उशिर झाला होता कारण या चेंगराचेंगरीने २२ पेक्षा अधिक जणांचा बळी घेतला होता. या चेंगराचेंगरीत अनेक महिलांचे कपडे फाटले, अनेकांच्या हाता-पायाला मुका मार लागला होता. महिलांचा आरडाआोरडीने ब्रिजशेजारी असलेल्या रेल्वे वसाहतीत राहणारे बाहेर आले. त्यांना जे दृश्य समोर दिसलं ते अत्यंत भयानक होतं. या रहिवाशांनी देखील अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत केली. त्यानंतर या रहिवाशांनी त्यांना चहा,पाणी आणि प्राथमिक औषधोपचार केला.