चार दिवसांत ६.५५ लाख मतदान वाढले कसे : सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 09:15 IST2025-10-17T09:15:22+5:302025-10-17T09:15:35+5:30
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या काळात राज्यातील नोंदणीकृत मतदारांची संख्या ९ कोटी २९ लाख ४३ हजार ८९० होती.

चार दिवसांत ६.५५ लाख मतदान वाढले कसे : सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत केवळ चार दिवसांत तब्बल ६ लाख ५५ हजार ७०९ मतदारांची वाढ कशी झाली?, असा सवाल मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी गुरुवारी केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप आणि निवडणूक आयोग यांच्या संगनमताने झालेल्या कथित ‘वोटचोरी’चा मुद्दा देशासमोर आणल्यानंतर, सावंत यांनी महाराष्ट्राच्या मतदार यादीतील विसंगती अधोरेखित केली आहे.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या काळात राज्यातील नोंदणीकृत मतदारांची संख्या ९ कोटी २९ लाख ४३ हजार ८९० होती. त्यानंतर ३० ऑगस्ट २०२४ पर्यंत ही संख्या ९ कोटी ५३ लाख ७४ हजार ३०२ वर पोहोचली. १५ ऑक्टोबरला निवडणूक जाहीर होताना मतदारसंख्या ९ कोटी ६३ लाख ६९ हजार ४१० इतकी होती. परंतु, केवळ १६ ते १९ ऑक्टोबर या चार दिवसांतच ही संख्या ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ वर गेली, म्हणजेच चार दिवसांत ६.५५ लाख मतदारांची वाढ झाली, असे सावंत म्हणाले.
पूर्ण वर्षभर मतदार नोंदणी प्रक्रिया सुरु असताना निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रचंड वाढ होणे अत्यंत संशयास्पद आहे. आयोगाने याचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही केली.