Join us  

‘ट्रम्प’ यांच्यामुळे पसरलेला कोरोना कसा विसराल?; भाई जगताप यांचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 6:29 AM

पूनम महाजन यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन

मुंबई : महाराष्ट्राला कोरोना स्प्रेडर म्हणून हिणविणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘नमस्ते ट्रम्प’  कार्यक्रमात  डोनाल्ड ट्रम्पचे ड्रम वाजवत होते. हजारोंच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात  मोठ्या प्रमाणात कोरोना पसरला. त्याचा त्यांना विसर पडला का? असा सवाल मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी रविवारी केला.

पंतप्रधानांनी संसदेत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ रविवारी  काँग्रेसच्या वतीने भाजप  खासदार पूनम महाजन यांच्या बीकेसी येथील निवासस्थानासमोर  माफी माँगो आंदोलन करण्यात आले, त्यावेळी ते  बोलत होते. पोलिसांनी महाजन यांच्या घरापासून काही अंतरावर मोर्चा अडविला. यावेळी कार्यकर्त्यांनी खासदार  महाजन, पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपविरोधात घोषणाबाजी केली.रस्त्यावर ठाण मांडलेल्या कार्यकर्त्यांसमोर जगताप म्हणाले की, ज्या महाराष्ट्रातून आणि उत्तर प्रदेशमधून  तुमचे नगरसेवक, आमदार, खासदार निवडून येतात, त्याच विभागातील लोकांचा कोरोना पसरवणारे म्हणून नरेंद्र मोदी उल्लेख कसा काय करू शकता? तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात ना, त्यामुळे जोपर्यंत माफी मागत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरू ठेवू. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन बीकेसी पोलीस ठाण्यात नेले. 

पीयूष गोयल यांचाही निषेधकेंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी  शनिवारी (दि. १९) एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता. त्याबद्दल त्यांचा तीव्र निषेध करण्यात आला. याबद्दल जगताप म्हणाले की, नरेंद्र मोदी व भाजपच्या इतर नेत्यांचा उल्लेख माननीय म्हणून केला; पण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात ते लहानाचे मोठे झाले, त्या शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अपमान करताना पीयूष गोयल यांना शरम कशी वाटत नाही? त्यांचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत.

टॅग्स :अशोक जगतापमहाराष्ट्रडोनाल्ड ट्रम्पनरेंद्र मोदी