Join us  

अनधिकृत मशिदींमधील भोंगे अधिकृत कसे?, नांगरे पाटलांचा फोन अन् राज ठाकरेंचा सवाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2022 1:56 PM

राज ठाकरे यांनी मुंबईचे सहपोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांचा फोन आल्याचीही माहिती दिली.

मुंबई

मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधात मनसेनं आजपासून राज्यात आंदोलन सुरू केलं आहे. ज्या मशिदींवर भोंगे लावून अजान दिली जाते अशा मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावण्याचं आवाहन राज ठाकरेंनीमनसे कार्यकर्त्यांना केलं आहे. राज ठाकरेंच्या या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पोलिसांकडून आज अनेक मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जात आहे. तर अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांकडून पहाटे हनुमान चालीसा लावण्याचा प्रयत्न झाला. त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे. 

...तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार, भोंग्यांचा विषय एक दिवसाचा नाही; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं!

मशिदीवरील भोंग्यांचा प्रश्न काही राजकीय नसून समाजिक विषय असल्याचं आज पुन्हा एकदा म्हटलं. तसंच आजचं आंदोलन हे काही एका दिवसाचं आंदोलन नसून जोवर मशिदीवरील भोंगे उतरवले जात नाहीत तोवर आमचं आंदोलन सुरूच राहणार असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसंच ज्यांनी ज्यांनी आज पहाटे भोंग्यांवरुन अजान न देता सहकार्य केलं अशा मौलवींचेही राज ठाकरे यांनी आभार मानले. 

दरम्यान, राज ठाकरे यांनी मुंबईचे सहपोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांचा फोन आल्याचीही माहिती दिली. "विश्वास नांगरे पाटील यांनी फोनवरुन मुंबईतील मशिदींच्या मौलवींशी बोलणं झालं असून ते पहाटेची अजान भोंग्यांवरुन देणार नसल्याचं आश्वासन दिलं आहे. तसंच दिवसभरातील अजान देखील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार होतील असं म्हटलं. पण आज मुंबईत मला मिळालेल्या माहितीनुसार १३५ मशिदींवर पहाटे भोंग्यांवरुन अजान झाली याविरोधात कारवाई केली जाणार आहे की नाही?", असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. 

"विश्वास नांगरे पाटील यांनी मला काल फोनवर आमच्याकडे इतक्या मशिदींकडून परवानगीचा अर्ज आला आहे आणि त्यांना आम्ही परवानगी दिली आहे अशी माहिती दिली. मूळात मुंबईतील मशिदी अधिकृत आहेत का? अनधिकृत मशिदींवरील भोंगे पण अनधिकृतच आहेत. तुम्ही अनधिकृत मशिदींवरील भोंग्यांना अधिकृत परवानगी देता. तुम्हाला नेमकं काय करायचं आहे? त्यामुळे मशिदीवरील भोंगे खाली उतरले गेलेच पाहिजेत. तुम्ही परवानगी देऊन पोलीस काय मग डेसिबल मोजत बसणार का? दिवसभर पोलिसांनी काय हाच धंदा करायचा का? त्यामुळे मशिदीवरील भोंगे उतरले गेलेच पाहिजेत", असं राज ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :राज ठाकरेमनसेविश्वास नांगरे-पाटील