मुंबईकरांनी चालायचे कसे आणि कुठून? ऑफिस, घर गाठताना होते दमछाक
By सचिन लुंगसे | Updated: July 21, 2025 12:53 IST2025-07-21T12:53:10+5:302025-07-21T12:53:31+5:30
घाटकोपर, कुर्ला, वांद्रे, विद्याविहार रेल्वे स्थानकांतून प्रवाशांना प्रवास वाटतोय नकोसा!

मुंबईकरांनी चालायचे कसे आणि कुठून? ऑफिस, घर गाठताना होते दमछाक
सचिन लुंगसे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कुलाबा ते मुलुंड तसेच चर्चगेट ते दहिसरपर्यंतचे बहुतांशी रेल्वे स्थानकांबाहेरील रस्ते रेल्वेसह विविध प्राधिकरणांनी विकास कामांसाठी खोदून ठेवले आहेत, तर काही ठिकाणी सुशोभीकरणाची कामे सुरू आहेत. काही स्थानक परिसरात फेरीवाल्यांचा विळखा आहे. कुर्ला, वांद्रे, विद्याविहार या स्थानकांच्या परिसराचा यात समावेश आहे. त्यामुळे आम्ही चालायचे कसे? असा सवाल नागरिक करत आहेत.
कुर्ला स्थानकातून अंधेरी, साकीनाका, कमानी, कुर्ला डेपो, बीकेसी, सांताक्रुझ येथे जाता येते; मात्र कुर्ला पश्चिमेला फलाट क्रमांक १ च्या सुशोभीकरणाच्या कामामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. या कामासाठी तोडलेल्या भिंतीचा राडारोडा अर्धा फलाटावर, तर अर्धा स्टेशन रोडवर पडला आहे. यातूनच वाट काढत प्रवासी बेस्ट, रिक्षा पकडण्यासाठी धावपळ करतात. कुर्ला पूर्वेलाही भुयारी मार्गातून बाहेर पडल्यानंतर मुख्य रस्त्याला लागेपर्यंत पादचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे.
विद्याविहार स्थानकात पूर्व व पश्चिमेला जोडणारा पूल बांधण्यात येत आहे. त्याकरिता पश्चिमेला बॅरिकेड्स टाकल्याने अर्धा रस्ता व्यापला आहे. उर्वरित अर्ध्या रस्त्यात फेरीवाले, रिक्षावाल्यांच्या गर्दीतून प्रवासी वाट काढत आहेत. तिकीट घरापासून शेअर रिक्षाच्या रांगेपर्यंत रस्त्यात खड्डे असून, रस्ताही समपातळीत नाही. पावसात साचलेल्या पाण्यातून वाट काढताना पादचाऱ्यांना एक तर कडेने किंवा दगडांवर पाय ठेवून ये-जा करावी लागते.
चक्रव्यूहातून वाट काढताना लेटमार्क
घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या पूर्व व पश्चिमेस फेरीवाले, वेड्यावाकड्या लागलेल्या रिक्षा आणि त्यातूनच जाणाऱ्या बेस्ट बस, या चक्रव्यूहातून बाहेर पडत ऑफिस गाठताना नोकरदारांना लेटमार्क लागत आहे. त्यातच भरीसभर म्हणून मेट्रो वनच्या प्रवाशांच्या गर्दीमुळे घाटकोपर स्थानक परिसरात अक्षरश: दमछाक होते.
ना फुटपाथ, ना धड रस्ता
वांद्रे स्थानकाच्या पूर्वेकडील स्कायवॉक पाडल्याने नागरिकांना तेथील रस्ता पार करणे जिकिरीचे होत आहे. हा रस्ता मोठ्या वर्दळीचा असून, विविध कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना या रस्त्यावरून अक्षरश: वाट शोधावी लागते आहे. ना फुटपाथ, ना धड रस्ता, अशी अवस्था येथे आहे. पादचाऱ्यांना अनेकवेळा खड्ड्यांत साचलेल्या पाण्यातून चालावे लागते. येथे स्कायवॉकचे काम सुरू असून, याचे साहित्य रस्त्यात पडले आहे. ठिकठिकाणी रस्ता आणि फुटपाथचा भाग खोदलेला आहे. त्यामुळे कलानगर आणि रेल्वे स्थानकादरम्यानचा प्रवास हा मुंग्याच्या गतीने होत असतो.
घाटकोपर पूर्व व पश्चिमेला स्टेशनजवळ अनधिकृत फेरीवाले, बेशिस्त उभी केलेली वाहने आणि त्यातच गर्दी, यामुळे त्रास होतो. घाटकोपर पश्चिमेला मेट्रो प्रवाशांचा लोंढा पुलावरूनच मेट्रो स्टेशनकडे जातो. पश्चिमेकडून रिक्षा व बसने येणारे आणि प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून येणाऱ्या प्रवाशांमुळे गर्दी वाढते. त्यामुळे तारांबळ उडते. शेअरिंग रिक्षाचालक सर्व नियम झुगारून रिक्षा चालवतात. फूटपाथ अनधिकृत फेरीवाल्यांनी बळकावल्याने रस्त्यावर चालणे जिकिरीचे झाले आहे. घाटकोपर पूर्वेला अशीच परिस्थिती आहे. - हरीश मुने, घाटकोपर
फलाट क्रमांक एक लगतचा रस्ता आणि फलाट यामध्ये डेब्रिज, भंगार साहित्य पडलेले आहे. रेल्वेने बांधकामापूर्वी जागा स्वच्छ करणे आवश्यक होते. रेल्वेचा जिना उतरतो, तेथील रस्त्यांवर नेहमीच खड्डे असतात. त्यात पाणी साचल्यावर डेब्रिज किंवा लाद्या टाकल्या जातात. त्यावरूनच प्रवासी ये-जा करतात. त्यात अनधिकृत फेरीवाले आणि बेशिस्त रिक्षाचालक कायम तापदायक ठरतात. - राकेश पाटील, कुर्ला
कुर्ला आणि घाटकोपरला जाण्यास त्रास होतो, म्हणून प्रवासी विद्याविहार स्टेशन निवडतात. मात्र, आता विद्याविहारलाही मोठी गर्दी होते आहे. निमूळता आणि ओबडधोबड रस्ता, त्यात साचलेले पावसाचे पाणी, स्कायवॉक असून नसून सारखा, अशी विद्याविहारची बिकट अवस्था आहे. महापालिका आणि रेल्वेचे याकडे दुर्लक्ष होत आहे. - संदीप पटाडे, विद्याविहार
कामावर जाताना वेळ पाळायची असल्याने थोडासाही विलंब अडचणीचा ठरतो. या ठिकाणी रिक्षा चालक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. त्यामुळे रस्त्यावरील मोठा भाग त्यांनी व्यापलेला असतो. परिणामी, कमी जागेतून मार्ग काढणे आमच्यासाठी जिकिरीचे ठरते. अशा वेळी खड्ड्यांमधील चिखलातून मार्ग काढत जावे लागत असल्याने कपडे खराब होण्याची भीती असते. - अमिता मोंडकर, कांजूर मार्ग
डिलाइल रोडमध्ये ऑफिस असल्याने लोअर परळ स्टेशनवर उतरून जावे लागते, परंतु रस्त्यावरील गर्दीमुळे अवघे २०० मीटर अंतर पार करण्यासाठी १५ ते २० मिनिटे लागतात.- रोहन पार्टे, प्रवासी