Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री सोनमच्या घरात हात साफ करणारे पोलिसांच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 03:37 IST

रिषी डे (२३) आणि व्ही. देवेंद्र अशी अटक आरोपींची नावे आहेत. रिषी हा अंबरनाथ तर देवेंद्र हा उल्हासनगरचा रहिवासी आहे.

मुंबई : वांद्रे येथील बँडस्टॅण्डला फिरताना सोनम कपूरचे लग्न झालेल्या रॉकडेल हा बंगला नजरेस पडला. सुरक्षारक्षक नाही, त्यात आलिशान बंगला पाहून त्यांची नियत फिरली. चोर पावलांनी त्यांनी बंगल्यात प्रवेश केला. नातेवाईक आपापल्या कामात व्यस्त असताना, त्या दुकलीने घरातील किंमती ऐवजावर हात साफ करून पळ काढला. मात्र, तपासाअंती वांद्रे पोलिसांनी शिताफीने दोघांना बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडे अधिक तपास सुरू आहे.

रिषी डे (२३) आणि व्ही. देवेंद्र अशी अटक आरोपींची नावे आहेत. रिषी हा अंबरनाथ तर देवेंद्र हा उल्हासनगरचा रहिवासी आहे. त्यांच्याविरुद्ध ठाणे परिसरात गुन्हे दाखल असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. त्यानुसार, अधिक तपास सुरू आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. ठाण्यात जास्त गुन्हे दाखल झाल्यास तडीपारीची कारवाई होऊ शकते, म्हणून त्यांनी मुंबईत मोर्चा वळविला. २६ सप्टेंबर रोजी बँड स्टँडवर फिरत असताना दोघांनी चोरी करण्याचे ठरविले. त्याच दरम्यान त्यांची नजर रॉकडेल या बंगल्यावर पडली. हा बंगला अभिनेते अनिल कपूर यांची मेव्हणी आणि सोनमची मावशी कविता सिंग यांचा आहे. याच बंगल्यात मे महिन्यात सोनमचे लग्न आनंद आहुजा यांच्यासोबत पार पडले. २६ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास या दोघांनी या बंगल्यातच चोरी करण्याचे ठरविले.

बंगल्याच्या संरक्षण भिंतीवरून तारेचे कुंपन तोडून त्यांनी आत प्रवेश केला. या वेळी घरात १२ ते १३ जण होते. दुकलीने बंगल्यातून लाखोंचा ऐवज चोरी करून पळ काढला. हा प्रकार तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.पहाटे ही बाब घरच्यांना समजताच, त्यांनी वांद्रे पोलिसांत तक्रार दाखल केली होती. 

टॅग्स :गुन्हेगारीमुंबई