Join us  

ऑनलाइन शिक्षणाचे तास पुरेसे नाहीत; 69 टक्के पालक नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 1:39 AM

आणखी अर्धा ते दोन तास वाढविण्याची मागणी

मुंबई : ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा ‘स्क्रीन टाइम’ वाढत असून त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी केंद्र सरकारने इयत्तेनुसार शिक्षणाचे तास ठरवून दिले आहेत. पूर्व प्राथमिक ते नववीपर्यंतच्या शिक्षणासाठी अर्धा ते तीन तास पुरेसे असल्याचे म्हटले आहे. मात्र, पालकांना ते अपुरे वाटतात.

‘लोकल सर्कल’ संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ऑनलाइन शिक्षणाची वेळ वाढवायला हवी, असे मत ६९ टक्के पालकांनी व्यक्त केले, तर सरकारने घातलेले वेळेचे बंधन २९ टक्के पालकांना योग्य वाटते. लॉकडाऊनमुळे ऑनलाइन शिक्षण सुरू झाले आहे. मात्र, या शिक्षणाच्या दुष्परिणामांबाबत चिंता व्यक्त झाल्यानंतर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने त्यात हस्तक्षेप केला. या शिक्षणाबाबतच्या मार्गदर्शक सूचना त्यांनी नुकत्याच जारी केल्या आहेत.

अभ्यासक्रमाची चिंता

अभ्यासक्रम पूर्ण होणार नाही ही पालकांना चिंता आहे, तर स्क्रीन टाइम कमी करायचा असेल तर तो अभ्यासाव्यतिरिक्त करणे सोयीस्कर असल्याचेही पालकांचे म्हणणे आहे. केंद्र सरकारचे हे आदेश लागू करणे राज्य सरकारवर बंधनकारक नसले तरी सर्वेक्षणातून पालकांचा कल अधोरेखित होतो. धोरण ठरविताना तो उपयुक्त ठरेल, असे ‘लोकल सर्कल’चे मत आहे.

अभ्यासाच्या वेळेबाबत नेमकी भूमिका काय?

नववी ते बारावीचे विद्यार्थी तीन तास ऑनलाइन शिक्षण घेतील, असे सरकारने स्पष्ट केले आहे. परंतु ४९ टक्के पालकांना यापेक्षा जास्त वेळ हवा असे वाटते.

पूर्व प्राथमिक वर्गांसाठी अर्धा तासच ऑनलाइन वर्ग घ्या, असे सरकारचे निर्देश आहेत. ते किमान एक तासाचे असावे असे ५६ टक्के पालकांनी सांगितले.सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने दीड तासाचा स्क्रीन टाइम ठरवून दिला आहे. पण ६९ टक्के पालकांना तो कमी वाटतो.पहिली ते पाचवीसाठी दीड तासाचा कालावधी निश्चित झाला आहे. मात्र, ५६ टक्के पालकांना हा वेळ पुरेसा वाटत नाही.

२३४ जिल्ह्यांत सर्वेक्षण

केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या शिक्षणाच्या तासांबाबत पालकांची मते जाणून घेण्यासाठी लोकल सर्कल या संस्थेने नुकतेच आॅनलाइन सर्वेक्षण केले. २३४ जिल्ह्यांतील २१ हजार ३२२ पालकांनी त्यात आपली मते नोंदवली. त्यात शिक्षणासाठी ठरवून दिलेली वेळ पालकांना अपुरी वाटत असल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :शिक्षणशाळा