मुंबईत 'सीएनजी' पंपांवर तासभराचं 'वेटिंग';महानगर गॅस लिमिटेडचे शहर, उपनगरांत केवळ ३८५ पंप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 12:52 IST2025-10-27T12:52:04+5:302025-10-27T12:52:26+5:30
इंधन भरण्यासाठी वाहनांच्या रांगा; वाहनचालक हैराण

मुंबईत 'सीएनजी' पंपांवर तासभराचं 'वेटिंग';महानगर गॅस लिमिटेडचे शहर, उपनगरांत केवळ ३८५ पंप
मुंबई : मुंबईत सीएनजी वाहनांचा वापर झपाट्याने वाढत असताना, शहरातील मर्यादित पंपसंख्येमुळे वाहनचालकांना इंधन भरण्यासाठी तासभर रांगेत थांबावे लागत आहे. सध्या महानगर गॅस लिमिटेडचे केवळ ३८५ सीएनजी पंप मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये कार्यरत आहेत. वाढत्या मागणीमुळे हे पंप अपुरे पडत असून, वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
कमी इंधनखर्च आणि पर्यावरणपूरक प्रवासामुळे नागरिकांचा कल सीएनजीकडे वाढत आहे. मुंबई आणि परिसरात सुमारे १० लाखांहून अधिक सीएनजी वाहने असून, कोरोनानंतर त्यांच्या नोंदणीत तब्बल २५ ते ३५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे आरटीओ विभागाने सांगितले. परंतु, शहरातील अनेक भागांमध्ये अजूनही सीएनजी पाइपलाइन पोहोचलेली नाही, त्यामुळे अनेक पंप टँकरवर अवलंबून आहेत. परिणामी, काही वेळा पुरवठा खंडित होतो आणि वाहनचालकांना अधिक प्रतीक्षा करावी लागते.
इंधन भरण्यासाठी ग्रामीण भागातील वाहनचालक पहाटेपासूनच रांगा लावत असल्याचे वाहनचालकांनी यावेळी बोलताना सांगितले.
तांत्रिक अडचणीचा फटका
'सीएनजी स्टेशनवर पोहोचल्यावर भरण्यासाठी फक्त तीन ते पाच मिनिटे लागतात, पण नंबर येण्यासाठी किमान अर्धा ते एक तास थांबावे लागते,' असे वाहनचालक महेश पाटील यांनी सांगितले.
पंप मालक प्रदीप शाह म्हणाले, 'वाहनसंख्या झपाट्याने वाढतेय. पंपांची संख्या वाढविणे आता अपरिहार्य झाले आहे. तांत्रिक अडचणीमुळेही कधी कधी विलंब होतो.'
वाढत्या मागणीसाठी उपाययोजना आवश्यक
आणखी सीएनजी पंप उभारणे आणि ऑनलाइन पंप आरक्षण प्रणाली सुरू करणे आवश्यक आहे. वाढती वाहने आणि मर्यादित पायाभूत सुविधा लक्षात घेता, प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे, असे सर्वांचे मत आहे.
रिक्षा, टॅक्सी आणि अॅप गाड्यांची भर
मुंबई आणि उपनगरांमध्ये एकूण ४ लाख ४४ हजार ऑटो रिक्षा आणि टॅक्सी असून, त्यापैकी बहुतांश सीएनजीवर चालतात. तसेच ओला-उबरसारख्या अॅप आधारित गाड्यांमध्येही वाढ झाली आहे.