Join us

"हॉटेल, रेस्टॉरंट सुरू झाले, आता वाचनालय सुरू करासर्व खबरदारी बाळगून वाचन संस्कृती टिकवू"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2020 21:16 IST

Mumbai News : वाचन संस्कृती टिकण्यासाठी आणि आर्थिक गर्तेत अडकलेले वाचनालय बाहेर काढण्यासाठी सरकारने तत्काळ वाचनालय सुरू केली पाहिजेत, असा सूर वाचक वर्गाकडून धरला आहे. 

- कुलदीप घायवट  

कल्याण - मागील सहा महिन्यांपासून वाचनालय बंद आहेत. राज्यात पुनश्च हरी ओम अंतर्गत जनजीवन पूर्वपदावर येत आहे. हॉटेल, रेस्टॉरंट सुरू झालेत. त्यामुळे वाचनालय सुरू करण्यास काहीच हरकत नाही.  कोरोना बाबतची सर्व खबरदारी घेऊन वाचक वाचनालयात जाऊ शकतो. वाचन संस्कृती टिकण्यासाठी आणि आर्थिक गर्तेत अडकलेले वाचनालय बाहेर काढण्यासाठी सरकारने तत्काळ वाचनालय सुरू केली पाहिजेत, असा सूर वाचक वर्गाकडून धरला आहे. 

कल्याण येथे राहणारे वाचक विनायक घाटे म्हणाले की, लॉकडाऊनमुळे मागील सहा महिन्यात एकही नवीन पुस्तक वाचायला मिळाले नाही. लॉकडाऊन आधी एका महिन्यात पाच ते सहा पुस्तके वाचून होत असायची. त्याप्रमाणे सहा महिन्यात ३० ते ३५ पुस्तके वाचून झाली असती. नवीन विचार आणि नवीन माहितीची भर ज्ञानात पडली असती.  मात्र वाचनालय अजून बंद असल्याने खूप गैरसोय होत आहे. हॉटेल, रेस्टॉरंट सुरू झाले आहेत. त्यामुळे आता वाचनालय सुरू करायला पाहिजेत. वाचनाची आवड खूप असल्याने कल्याण येथील सार्वजनिक वाचनालयाचा मागील २७ वर्षांपासून सदस्य आहे. 

कल्याण येथे राहणारे वाचक सतीश घरत म्हणाले की, टीव्हीवर त्याच-त्याच बातम्या बघून कंटाळा आला आहे. सोशल मीडियावर देखील नवीन काही सुरू नसते. त्यामुळे पुस्तके वाचायला वेळ देणे अधिक उत्तम वाटते. मागील सहा महिन्यात घरात असलेली सर्व पुस्तके वाचून झाली. ऑनलाइन वाचन करणे, गैरसोयीचे आहे.  कोरोना काळात सर्व खबरदारी बाळगून वाचनालयात जाता येऊ शकते. त्यामुळे सरकारने वाचनालय  सुरू करणे आवश्यक आहे. इतर गोष्टी ज्याप्रमाणे सुरू होत आहेत, तसेच वाचनालय सुरू व्हायला पाहिजे. 

कल्याण येथील सार्वजनिक वाचनालयातील लिपिक स्वाती गोडांबे म्हणाल्या की, सध्या वाचनालय आर्थिक कोंडीत सापडली आहेत. मागील सहा महिन्यांपासून वाचक आणि वाचनालय यांचा संबंध तुटला आहे. त्यामुळे मार्च महिन्यात घेऊन गेलेली पुस्तके अजून परत मिळाली नाही. अशी २ हजार ते २ हजार ५०० पुस्तके वाचकांकडे आहेत. वाचकांकडून येणारे शुल्क थांबले आहे. यासह आता वारंवार पुस्तकांना सॅनिटायझेर करणे, वाळवी प्रतिबंधक करणे गरजेचे झाले आहे. वाचनालय सुरू झाल्यावर ही कामे नियमित करावी लागणार आहेत.  वाचनालयात काम करणाऱ्या वाचकांचा पगार देणे आहे. त्यामुळे वाचनालय आर्थिक कोंडीत सापडली आहेत. 

 

टॅग्स :लॉकडाऊन अनलॉकमुंबई