Join us

परदेशातून आलेल्यांना परवडेना मुंबईतील हाॅटेल; पालिकेचा आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2021 02:41 IST

परदेशातून आलेल्यांना परवडेना मुंबईतील हाॅटेल

मुंबई : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आल्यानंतर २१ डिसेंबरपासून मुंबईत येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात येत आहे.  मात्र सात दिवस हॉटेलमध्ये राहणे परवडत नसलेल्या काही प्रवाशांनी महापालिकेचा पाहुणचार स्वीकारला आहे. दक्षिण आफ्रिका, मध्य पूर्व आणि युरोप येथून आलेल्या सुमारे चारशे प्रवाशांना पालिकेच्या भायखळा येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये क्वारंटाइन केले आहे.

ब्रिटन व अन्य देशांतून आलेल्या प्रवाशांना कोरोना झालेला नाही, याची खात्री होईपर्यंत त्यांची व्यवस्था मुंबईतील हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. मात्र पालिकेने निवडलेल्या हॉटेलचा सात दिवसांचा खर्च काही प्रवाशांना परवडणारा नाही. त्यामुळे आपल्या राहण्याची व्यवस्था अन्य ठिकाणी करावी, अशी विनंती मुंबई पालिका प्रशासनाला केली होती. त्यानुसार भायखळा येथील केंद्रात अशा चारशे प्रवाशांचा पाहुणचार महापालिकेने केला आहे.

या जम्बो सेंटरमध्ये नाश्ता व तीन वेळा मोफत जेवण दिले जाते. क्वारंटाइन करण्यात आलेल्या प्रवाशांनी सात दिवसांचा कालावधी पूर्ण केल्यानंतर त्यांना घरी जाण्यास परवानगी दिली जाते. आतापर्यंत अशा ७५ हून अधिक प्रवाशांना डिस्चार्ज मिळाला आहे. मात्र या केंद्रातील सर्व सेवा मोफत असून, कोरोनाबाधित रुग्णांना मात्र येथे ठेवण्यात येत नाही. केवळ कोरोना संशयित व्यक्तींना येथे सात दिवस ठेवण्यात येत असल्याचे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

३२ पॉझिटिव्ह, १० कोरोनामुक्त

ब्रिटनवरून २१ डिसेंबरपासून तसेच गेल्या महिन्याभरात मुंबईत आलेल्या प्रवाशांपैकी आतापर्यंत ३२ प्रवासी बाधित असल्याचे समोर आले आहे. यापैकी १० लोकांचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आला आहे. या सर्वांचे नमुने ‘जिनोम सिक्वेन्स’साठी पुणे येथील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी’कडे पुनर्तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तेथून अहवाल येईपर्यंत कोरोनामुक्त झालेल्या प्रवाशांनाही डिस्चार्ज न देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसहॉटेलमुंबई