दारूचे पैसे मागितले म्हणून बार वेटरची हत्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 12:40 IST2018-10-05T09:57:05+5:302018-10-05T12:40:07+5:30
दारूचे पैसे मागितले म्हणुन बारमधील वेटरवर बर्फ कापण्याच्या हत्याराने वार करण्याचा प्रकार गुरुवारी रात्री एलफिन्स्टन रेल्वे स्थानकाजवळील दारूच्या दुकानामध्ये घडला.

दारूचे पैसे मागितले म्हणून बार वेटरची हत्या!
गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई - दारूचे पैसे मागितले म्हणुन बारमधील वेटरवर बर्फ कापण्याच्या हत्याराने वार करण्याचा प्रकार गुरुवारी (4 ऑक्टोबर) रात्री एलफिन्स्टन रेल्वे स्थानकाजवळील दारूच्या दुकानामध्ये घडला. याप्रकरणी शैलेश गुप्ता (वय-30) याला एन एम जोशी मार्ग पोलिसांनी अटक केली असुन चौकशी सुरू आहे.
एल्फिन्स्टन पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ 'रेड रोझ कंट्री लिक्विर शॉप' बार आहे. या बारमध्ये गुरुवारी रात्री गुप्ता दारू पिण्यासाठी आला होता. मात्र दारू आणि खाण्यापिण्याचे पैसे न देताच तो तिथुन जाऊ लागला. तेव्हा बारमधील वेटर गणेश एस (वय-40) याने त्याला अडवले आणि खाण्यापिण्याचे बिल देण्याची विनंती केली. त्यावरून या दोघांमध्ये वाजले. तेव्हा जवळच असलेल्या बर्फ कापण्याच्या हत्याराने गुप्ताने गणेशवर हल्ला चढवला. या हल्ल्यात गणेश गंभीर जखमी झाला. त्याला बारमालक आणि अन्य सहकाऱ्यांनी मिळून रुग्णालयात दाखल केले. तर गुप्ताला पकडुन पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या हल्ल्यात गणेशचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला असुन गुप्तावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गणेशच्या घरच्यांना कळविण्यात आले असुन पोलीस अधिक चौकशी करत आहेत.