आईस्क्रीमच्या फॅमिली पॅकवर दहा रुपये जादा घेणाऱ्या हॉटेलला २ लाखांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 07:58 IST2020-09-18T01:29:49+5:302020-09-18T07:58:14+5:30
पॅकवर छापील किंमत १६५ रुपये असल्याचे कॅशिअरच्या निदर्शनास आणून देत १० रुपये परत मागितले. मात्र, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

आईस्क्रीमच्या फॅमिली पॅकवर दहा रुपये जादा घेणाऱ्या हॉटेलला २ लाखांचा दंड
- दीप्ती देशमुख
मुंबई : आईस्क्रीमच्या फॅमिली पॅकवर १० रुपये जादा आकारल्याने दक्षिण मुंबई जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने मुंबई सेंट्रल जंक्शन येथील शगुन व्हेज रेस्टॉरंटला २ लाख १५ हजार १० रुपयांचा दंड ठोठावला.
डॉ. डी.बी. मार्ग पोलीस स्टेशन येथे पोलीस उपनिरीक्षक असलेले भास्कर जाधव हे ८ जून २०१४ रोजी रात्री घरी परतत असताना त्यांनी शगुन रेस्टॉरंटमधून कुटुंबीयांसाठी स्ट्रॉबेरी आईस्क्रीमचा फॅमिली पॅक घेतला. कॅशिअरने त्यांच्याकडून १७५ रुपये घेतले. पॅक हातात आल्यावर जाधव यांनी पॅकवर छापील किंमत १६५ रुपये असल्याचे कॅशिअरच्या निदर्शनास आणून देत १० रुपये परत मागितले. मात्र, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
जाधव यांनी त्याच्याकडून बिल घेतले. त्यानंतर दक्षिण मुंबई जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात तक्रार केली. आईस्क्रीमचे पॅक्स फ्रीजमध्ये जतन करून ठेवण्यासाठी येणा-या खर्चापोटी व सेवा करापोटी छापील किमतीपेक्षा अतिरिक्त १० रुपये आकारले, असा युक्तिवाद रेस्टॉरंटतर्फे करण्यात आला. मात्र, तो मंचाने फेटाळला.
ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ च्या कलम १४(१) (एच) (बी) चा वापर करणे संयुक्त असल्याचे मत नोंदवीत मंचाच्या अध्यक्षा स्नेहा एस. म्हात्रे व सदस्य डी. एस. पराडकर यांनी संबंधित रेस्टॉरंटला ग्राहक कल्याण निधीत २ लाख रुपये भरण्याचा, तर तक्रारदाराला मानसिक त्रासापोटी १० हजार, न्यायिक खर्चापोटी ५,००० रुपये व आईस्क्रीमच्या फॅमिली पॅकवर आकारलेले अतिरिक्त १० रुपये परत करण्याचा आदेश दिला.