रुग्णालयांचा औषध खरेदी करार २ वर्षांचा; विलंब टाळण्यासाठी निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 08:13 IST2025-12-11T08:11:49+5:302025-12-11T08:13:50+5:30
राज्यातील वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांना औषधी आणि यंत्रसामग्री खरेदी करताना विलंब होत होता. करारासाठी आवश्यक असणारे वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे.

रुग्णालयांचा औषध खरेदी करार २ वर्षांचा; विलंब टाळण्यासाठी निर्णय
मुंबई : औषधी आणि यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी बंधनकारक असणारे दर करार वर्षभरात संपुष्टात येत असल्यामुळे महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणामार्फतच्या खरेदीचा दर करार आता दोन वर्षांचा करण्यात येणार आहे.
राज्यातील वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांना औषधी आणि यंत्रसामग्री खरेदी करताना विलंब होत होता. करारासाठी आवश्यक असणारे वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे. त्यामुळे आता रुग्णालयांना औषधी खरेदीस विलंब होणार नाही. शासनाच्या विविध विभांगाकडून वेगवेगळ्या कालावधीत मागणीनुसार एकाच खरेदीसाठी वेगवेगळ्या निविदा राबविल्या जातात. त्यामुळे औषधी व साधनसामग्री पुरवठ्यास विलंब होतो, तसेच प्रत्येक वेळी वेगवेगळे दर असतात. त्यामुळे खर्चही वाढतो. तसेच काही वेळा वेळेवर औषधी खरेदी होत नाही. दर करार निश्चित झाल्यानंतर महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण व इतर सर्व शासकीय, निमशासकीय संस्था, जिल्हा नियोजन समिती, स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या आवश्यकतेनुसार या दर करारानुसार औषधी खरेदी करता येतील.
असे असेल वेळापत्रक
पहिल्या वर्षासाठी लागणारी औषधी व आर्थिक वर्षामध्ये उपलब्ध निधीनुसार संबंधित विभागाकडे वित्तीय मान्यतेसाठी १५ एप्रिलपर्यंत प्रस्ताव सादर करावा. त्यासोबत विभागीय कार्यालयाने संपूर्ण प्रस्ताव सादर केल्यानंतर विभागांना ३० एप्रिलपर्यंत त्यास वित्तीय मान्यता देणे आवश्यक आहे.
७ मेपर्यंत पुढील तीन महिन्यांसाठी खरेदी प्राधिकरणाने खरेदी आदेश देणे. ३० मे रोजी सर्व पुरवठादारांनी सर्व जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष पुरवठा करणे, १५ जूनपर्यंत सर्व बॅचेसची गुणवत्ता तपासणी पूर्ण करून औषधीसाठा वापरण्यासाठी खुला करणे, तसेच ३० जून रोजी पुरवठादारांची देयके देण्याच्या सूचना दिल्या आहेत.